डिसेंबर १९९० मध्ये प्रजासत्ताक कझाकस्तानात सार्वत्रिक निवडणुका होऊन नूरसुलतान  नझरबायेव हे राष्ट्राध्यक्षपदी निर्वाचित झाले. या नूतन अध्यक्षांनी १६ डिसेंबर १९९१ रोजी प्रजासत्ताक कझाकस्तान हा सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडून एक सार्वभौम देश म्हणून अस्तित्वात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर हा देश युनायटेड नेशन्स आणि कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स या संघटनांचा सदस्य देश बनला. अध्यक्षांनी स्वत:कडचे अधिकार वाढवून इ.स.२००० पर्यंत राष्ट्राध्यक्षपदाची कालमर्यादा वाढवून घेतली. शेती आणि उद्योगक्षेत्रात खासगीकरणावर भर दिला. १९९० मध्ये राष्ट्राध्यक्ष झालेल्या नूरसुलतान  नझरबायेव यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा मार्च २०१९ मध्ये राजीनामा दिला. या २९ वर्षांमधील प्रत्येक निवडणूक त्यांनी जिंकली ती मनमानी करून. या निवडणुकांमध्ये फक्त त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला – अर्थात त्यांनाच उमेदवारी अर्ज भरायला परवानगी होती! मतपत्रिकेवर एकटे त्यांचे नाव ठेवून! त्यांनी राजीनामा देताना त्यांच्या पक्षातल्याच कासीम टोकावय यांना २०१९ मध्ये राष्ट्रपती नियुक्त केले. टोकावय हे सध्या प्रजासत्ताक कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष आहेत. १९९७ मध्ये देशाची पूर्वीची राजधानी अलमाटी येथून हलवून अस्ताना येथे नेली. अत्यंत मजबूत अर्थव्यवस्था असलेला कझाकस्तान तेल, नैसर्गिक वायू आणि विविध खनिजांनी समृद्ध आहे. या प्रदेशात १६० तेलसाठे आहेत. या उद्योगात परकीय राष्ट्रांची प्रचंड मोठी गुंतवणूक असून तेल, नैसर्गिक वायू यांच्या निर्यातीतून त्यांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ६० टक्के हिस्सा कझाकस्तानला मिळतो. २००१ साली कझाकस्तानमधील पश्चिमेकडील तेनझीग ऑइल फिल्डमधून रशिया आणि इतर युरोपियन देशांपर्यंत पाइपलाइन टाकून तेल आणि वायूचा पुरवठा सुरू झाला. बेल्ट अ‍ॅण्ड रोड या चीनच्या संभाव्य प्रकल्पात कझाकस्तानला महत्त्वाचे स्थान आहे. बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्स, फुटबॉल हे कझाखी लोकांचे आवडते खेळ. आतापर्यंत या देशाने ऑलिम्पिकमध्ये तीन वेळा बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली तर डिम्रिटी कारपोव्ह याने डेकॅथेलॉन या क्रीडा प्रकारात दोन वेळा रौप्यपदक मिळविले आहे. ओल्गा रिपाकोव्हा हिने ट्रिपल जम्प या प्रकारात पदकांची कमाई केली आहे. अलझान या कझाख खेळाडूला जगातील सर्वोत्तम बास्केटबॉल खेळाडूचा मान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Current kazakhstan coutry zws
First published on: 25-10-2021 at 01:03 IST