महासागर या महाप्रचंड, परिपूर्ण आणि जटिल परिसंस्थेने खूप मोठय़ा परिसराला आपल्या कवेत घेतले आहे. भरती-ओहोटीच्या दरम्यानचा सागरी किनारा, किनाऱ्यालगतचा खारफुटीचा प्रदेश, खाडी, खाऱ्या पाण्यातील दलदलीचा प्रदेश, प्रवाळ खडक, नदी-समुद्राला मिळते तो त्रिभुज प्रदेश, सागरी कुरण, सागराचा पृष्ठभाग, मधला भाग, सागरतळ अशा अनेक लहान-मोठय़ा परिसंस्थांनी महासागर व्यापलेला असतो.
वनस्पतीप्लवक हा सागरी अन्नसाखळीतील सर्वात महत्त्वाचा सजीव. ते प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात. त्यांच्यापासून अन्नसाखळी सुरू होते ती महाकाय व्हेलपर्यंत पोहोचते. या प्राण्यांनी उत्सर्जित केलेले पदार्थ, छोटय़ा-मोठय़ा प्राण्यांचे मलमूत्र आणि या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मृत शरीरे यांचे पुढे विघटन झाले नाही तर अशा मृत शरीरांचा समुद्रात खच पडेल. सागरी परिसंस्था कोलमडेल, पण असे होत नाही. इथे सागरातील विघटनकारक जिवाणू (बॅक्टेरिया) मदतीला धावून येतात. मृत प्राण्यांच्या शरीरात अडकून पडलेली कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस इत्यादी अनेक मूलद्रव्ये ते पुन्हा सागराला बहाल करतात आणि जीवनचक्र अखंडपणे सुरू राहते.
हे जिवाणू प्राण्यांच्या, वनस्पतींच्या मृत शरीरात असलेली कबरेदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, न्युक्लिइक आम्ल या घटकांचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्यांचे विघटन करून कार्बन डायऑक्साइड, अमोनिया, फॉस्फेट, नायट्रेट, सल्फेट यांत रूपांतर करतात. या प्रक्रियेत अनेक मूलद्रव्यांची (उदा. लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम) खनिजे मोकळी होतात. असा कच्चा माल वापरून वनस्पतीप्लवक पुन्हा अन्न तयार करून अन्नसाखळी अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी सज्ज होतात.
समुद्रातील हे विघटनकारी जिवाणू वैशिष्टय़पूर्ण असतात. त्यातील काही २ ते ३ अंश सेल्सिअस तापमानातही वाढतात. समुद्राच्या तळाशी ज्वालामुखीमुळे भगदाड पडून तेथील तापमान ३०० ते ४०० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. त्यामुळे आसपासचे पाणी गरम होते. अशा गरम पाण्यातही काही जिवाणू वाढतात. समुद्राच्या तळाशी पाण्याचा दाब किती प्रचंड असेल? दहा-अकरा किलोमीटर खोलीच्या सागरतळाशी ११० मेगापास्कल इतका प्रचंड दाब असतो. तेथेही हे विघटक जिवाणू आपले काम चोख करतात. ‘हॅलोमोनास सलारिया’, जिओबॅसिलस, शेवानेला, पेलॅजीबॅक्टर युबिकी हे जिवाणू टोकाच्या प्रतिकूल परिस्थितीतही काम करतात.
– बिपिन देशमाने
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org