‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’; पण समुद्रातील याच खाऱ्या पाण्यात विविध प्रकारचे मासे, जलचर, वनस्पती, जिवाणू आणि विषाणू अशी मोठ्ठी जीवसृष्टी आढळते. समुद्रातसुद्धा पृथ्वीप्रमाणे दऱ्या आणि डोंगर असतात. पाण्याचे प्रवाहही समुद्रात वाहत असतात. समुद्राच्या पोटातील मैलो न् मैल खोल असलेल्या अथांग पाणथळात राहणारे विविध जिवाणू रोज हजारो टन सेंद्रिय पदार्थ तयार करतात.

समुद्राच्या पृष्ठभागावरच्या स्तरात बराच प्रकाश असतो व इथले पाण्याचे तापमानही जास्त असते. मात्र आपण जसजसे खोलवर जाऊ, तसतसा प्रकाश कमी कमी होत जातो व तापमानही कमी कमी होत जाते. त्या-त्या खोलीवर आढळणारे क्षार, तेथील तापमान, प्रकाश, अन्नपुरवठा आणि खाऱ्या पाण्याचा दाब, इत्यादी गोष्टींवर सागरीजीवन अवलंबून असते. समुद्रातील तीन हजार ते पाच हजार मीटर खोल असलेल्या पाण्याचे तापमान २ अंश सेल्सिअस एवढे असते.

अगदी खोल म्हणजे १० हजार मीटर खोलीपर्यंतही बरेच सागरी जिवाणू आढळतात. एवढ्या मोठ्या दाबाखाली ते जिवंत राहतात! पाण्याचे तापमान अंश सेल्सिअसपेक्षा वाढले तर ते जगू शकत नाहीत. शास्त्रज्ञांना सामुद्रिक जैवविविधता शोधण्यासाठी मोठीमोठी संशोधन सामग्री घेऊन, समुद्रातील पाण्याचे नमुने घेऊन, तिथे जे पाण्याचे तापमान व जो पाण्याचा दाब असेल तीच परिस्थिती निर्माण करून प्रयोगशाळेत त्यांचे संवर्धन करावे लागते. अटलांटिक आणि प्रशांत महासागरात हॅलोमोनास, सायर्कोबॅक्टर स्नेनोट्रोफोमोनास, स्यूडोमोनास आणि प्सुडाल्टरोमोनास वगैरे गॅमाप्रोटीयोबॅक्टेरियाचे जिवाणू आढळून आलेले आहेत. हल्ली गाळातील जिवाणूंचे प्रयोगशाळेत न आणताच वर्गीकरण नवीन पद्धतीने करता येते.

समुद्रातील पाणथळाखाली असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या (हायड्रोथर्मलव्हेंट) आसमंतात विस्मयकारी जिवाणू सापडतात. येथील काही जिवाणू गंधकयुक्त क्षार वापरून खोल समुद्रातील गडद अंधारात स्वत:चा उदरनिर्वाह करतात. त्यांना केमोऑटोट्रोफ म्हणतात कारण ते विविध रसायनांतील ऊर्जा वापरून आपले जीवन जगतात. यातील हिरव्या गंधक जिवाणूंची खासियत अशी की समुद्राच्या पोटातील उष्णतेमुळे चमकणाऱ्या दगडधोंड्यांमधून निघणारा प्रकाश वापरून ते प्रकाशसंश्लेषण करतात. समुद्राच्या तळाशी गंधक, हायड्रोजन आणि कार्बनडायऑक्साइड वापरणारे जिवाणू मजेत राहतात. या जिवाणूंच्या जवळपास दहा हजार प्रकारच्या प्रजाती जगातील विविध हायड्रोथर्मलव्हेंटच्या आसपास शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत. त्यातील बऱ्याच प्रजाती आद्याजिवाणूंच्या आहेत. हे सर्व जिवाणू गरम पाण्यातच जिवंत राहू शकतात. या जिवाणूंचे खोल समुद्रातील इतर जीवसृष्टीबरोबर सहजीवन असते, त्यात बऱ्याच सेंद्रिय पदार्थांची देवाणघेवाण सुरू असते.

डॉ. जयश्री कृष्णा सैनिस

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org