डॉ. गजानन माळी
नुकताच अहमदाबादला भीषण विमान अपघात झाला. नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी लोकांची रीघ लागलेली होती. जळून गेलेले मृतदेह ओळखायचे कसे? नातेवाईक आले होते त्यांच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी! अर्थातच त्यांचा डीएनए देण्यासाठी. तो कोणाशी जुळतो ते ठरवण्यासाठी! डीएनए अंगुलीमुद्रण म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटिंग.

कोणत्याही दोन व्यक्तींच्या जनुकांची अर्थात डीएनएची छायाचित्रे वेगळी असतात. म्हणून एखाद्या व्यक्तीची त्याच्या जनुकीय (डीएनए) विश्लेषणाद्वारे ओळख करून घेण्याच्या तंत्राला ‘डीएनए अंगुलीमुद्रण’ म्हणतात. शब्दाला जसा अक्षरांचा एक क्रम असतो त्याच पद्धतीने डीएनएमध्ये न्युक्लिओटाइड्सचा क्रम महत्त्वाचा असतो. जगातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए थोड्या फरकाने वेगळा असतो (जुळ्या भावंडांना वगळता) आणि त्याच्या याच वैशिष्ट्याचा उपयोग ओळख पटवण्यासाठी होतो. माणसाच्या जीनोमचा (पेशीतील संपूर्ण डीएनए) विचार केला तर त्यातील ९९ टक्के डीएनए सर्व व्यक्तींमध्ये सारखाच असतो, पण उरलेल्या एक टक्का डीएनएमधील काही भाग हे व्यक्तीपरत्वे वेगळे असतात व ते डीएनएच्या ‘पॉलिमॉर्फिक’ भागात आढळतात. म्हणून या तंत्रज्ञानामध्ये वैज्ञानिक पॉलिमॉर्फिक भागांचा विशेष अभ्यास करतात. प्रत्येक व्यक्तीच्या ‘पॉलिमॉर्फिक’ डीएनएची लांबी, त्यातील न्युक्लिओटाइड्सची पुनरावृत्ती किंवा त्यांच्या क्रमवारीत फरक असतो. उदाहरणार्थ, काही ठिकाणी ४-५ न्युक्लिओटाइडची मालिका एका व्यक्तीत १० वेळा येते, तर दुसऱ्यात ती फक्त ७ वेळा येते.

डीएनए फिंगरप्रिटिंगचे तंत्र प्रथम १९८४मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ अलेक जेफ्रीज यांनी विकसित केले. यामध्ये लाळ, रक्त, केसांचे मूळ, त्वचा, वीर्य व इतर जैविक नमुन्यांतून डीएनए वेगळा केला जातो. त्यानंतर पीसीआर (पॉलिमरेज चेन रिअॅक्शन) तंत्राच्या साहाय्याने पॉलिमॉर्फिक भागामधील डीएनएच्या अनेक प्रती तयार करतात. विशिष्ट प्रकारच्या रेस्ट्रिक्शन विकराच्या साहाय्याने या पॉलिमॉर्फिक डीएनएचे वेगवेगळ्या आकाराचे अनेक तुकडे केले जातात. नंतर हे तुकडे विद्याुतप्रवाहाच्या मदतीने (जेल इलेक्ट्रोफोरेसीस तंत्राने) जेलमध्ये त्यांच्या आकारानुसार वेगळे करून रंगीत पट्ट्याच्या स्वरूपात मिळवले जातात. हे सर्व रंगीत पट्टे म्हणजेच त्या व्यक्तीचा डीएनए फिंगरप्रिंट! यांच्यातील साम्य ओळखून पालकत्वाचा वाद सोडविता येतो, मूल आणि माता-पिता यांचा संबंध शोधता येतो. एखाद्या गुन्ह्यात गुन्हेगाराची ओळख पटविता येते किंवा मृत व्यक्ती ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. थोडक्यात, शरीरातील डीएनए म्हणजे एक नैसर्गिक ओळखपत्र आहे.
डॉ. गजानन माळी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org