बिपीन भालचंद्र देशमाने

पुस्तकांची लायब्ररी असते, पण डीएनएची लायब्ररी! हा काय प्रकार आहे? पेशींमध्ये केंद्रक असतो. केंद्रकात गुणसूत्रे असतात. प्रत्येक गुणसूत्र डीएनएच्या लांबच लांब धाग्यांनी बनलेले असते. डीएनए अॅडेनाईन, ग्वानाईन, सायटोसाईन आणि थायमाईन या चार न्यूक्लिओटाइडना असंख्य वेळा आलटूनपालटून जोडून बनलेला असतो. हे चार न्यूक्लिओटाइड्स म्हणजे सजीवाच्या जीवनग्रंथाची मुळाक्षरे! या मुळाक्षरांचा अनुक्रम म्हणजेच डीएनएत साठवलेली माहिती! माणसाच्या संपूर्ण डीएनए, जिनोममध्ये सुमारे तीन अब्ज न्यूक्लिओटाइट असतात. एवढ्या मोठ्या जिनोम कुंडलीच्या महाप्रचंड मोठ्या ग्रंथाचे वाचन किंवा अभ्यास करायचा झाला तर महाकर्मकठीण! त्यासाठी डीएनएचे तुकडे करून त्या छोट्या छोट्या तुकड्यांचा अभ्यास करणे इष्ट आणि सोपे पडते!

डीएनएचे हे छोटे तुकडे ई. कोलायसारख्या जिवाणूच्या छोट्या गुणसूत्राला जोडून द्यायचे! एकेका ई. कोलायमध्ये एकेक तुकडा! डीएनएची लायब्ररी तयार! ज्या तुकड्याचा अभ्यास करायचा आहे तो ई. कोलाय प्रयोगशाळेत वाढवायचा, तो तुकडा मिळवायचा आणि त्याचे वाचन करायचे! माणसाच्या पेशीतील सर्व डीएनए छोट्या छोट्या तुकड्यांच्या रूपाने अनेक ई. कोलायमध्ये विखुरला जातो. छोटा तुकडा म्हणजे जिनोमच्या महाविराट ग्रंथाचे एक पान किंवा छोटी पुस्तिका!

माणसाच्या किंवा सजीवाच्या पेशीतून डीएनए वेगळा करतात. त्याला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियेज नावाच्या एन्झाइमच्या सान्निध्यात ठेवतात. हे विकर डीएनएला काही विशिष्ट ठिकाणी कापते. ही डीएनएला कापणारी कात्रीच आहे! डीएनएचे झालेले तुकडे वेगळे करतात. त्याच वेळी वर्तुळाकार प्लाझ्मिड फक्त एका ठिकाणी कापला जाईल हे पाहतात. त्यासाठी तेच विकर वापरतात. डीएनएचे तुकडे आणि सरळ झालेला प्लाझ्मिड यांना एकत्र आणतात. हे दोन डीएनएचे तुकडे जोडण्यासाठी लिगेज नावाचे विकर वापरतात आणि पुन्हा वर्तुळाकार प्लाझ्मिड बनतो. कापा, जोडा आणि चिकटवा अशा पद्धतीने हा नवीन डीएनए तयार होतो. हा नावीन्यपूर्ण प्लाज्मिड ई. कोलाय जिवाणूमध्ये घुसवतात! या जनुकीय अभियांत्रिकी प्रक्रियेला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. अशा प्रकारे मानवी पेशीचा संपूर्ण डीएनए तुकड्यांच्या रूपाने वेगवेगळ्या ई. कोलायमध्ये विराजमान होतो! झाली डीएनएची लायब्ररी! ह्यूमन जिनोम प्रोजेक्टमध्ये प्रत्येक लांबलचक रंगसूत्राचे असेच तुकडे करून ई. कोलाय पेशींमध्ये क्रमाने जतन करून त्याचे वाचन केले गेले. याद्वारे नवीन जनुकांचा शोध, जनुके नियंत्रित करणाऱ्या जनुकांचा शोध घेता येतो किंवा अप्रकट जनुकांचादेखील शोध घेता येतो.

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org