बिपीन देशमाने
डीएनएच्या एक्स-रे क्रिस्टलोग्राफिक ‘फोटो-५१’शिवाय आणि ज्या विदुषीने हा फोटो काढला, त्या रोझॅलिंड फ्रँकलिन यांच्याशिवाय डीएनएच्या संरचनेचा शोध लागला नसता. विज्ञान जगतात ‘फोटो-५१’ अजरामर झाला परंतु रोझॅलिंड फ्रँकलिन उपेक्षित राहिल्या.

डीएनएच्या संरचनेचा शोध म्हणजे गेल्या शतकातील जीवशास्त्रातील सर्वांत मोठा शोध! या शोधाची सक्रिय शोधकर्ती म्हणून त्यांना सन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही. दुर्दैवाने १९५८साली त्यांचे कर्करोगाने निधन झाले. १९६२साली या शोधासाठी नोबेल पारितोषिक जाहीर झाले. नोबेल पारितोषिक मरणोत्तर दिले जात नसल्यामुळे त्यांना ते मिळाले नाही. त्या जिवंत असत्या तर त्यांना हे पारितोषिक निश्चितच मिळाले असते.

मोठमोठ्या रेणूंची सखोल त्रिमितीय संरचना जाणून घेण्यासाठी क्ष-किरण विवर्तन तंत्र वापरले जाते. क्ष-किरणांची तरंग-लांबी फार कमी असते. महारेणू स्फटिक किंवा अतिसूक्ष्म धागे यावर क्ष-किरण सोडले जातात. क्ष-किरण अणूंच्या मधून निघून जातात किंवा मार्गात आलेल्या अणूंमुळे त्यांची दिशा बदलते. महारेणू भेदून गेलेल्या आणि दिशा बदललेल्या क्ष-किरणांमुळे एक्स-रे फिल्मवर विशिष्ट प्रतिमा तयार होते. प्रतिमा पाहून आणि असंख्य गणितीय आकडेमोडी करून पदार्थाची संरचना कशी असेल हे ताडले जाते. डीएनएची संरचना लख्खपणे समोर आणणारा हाच जगप्रसिद्ध ‘फोटो-५१’. रोझालिंडच्या परवानगीशिवाय मॉरिस विल्किन्स यांनी दाखवलेल्या या फोटोवर जेम्स वॉटसन यांनी नुसती नजर टाकली आणि ते उडालेच! क्रिककडे धावत सुटले. डीएनए दोन धाग्यांनी बनलेला असून एकमेकांवर हे धागे गुंडाळलेले आहेत म्हणजेच डीएनए डबल हेलिक्स आहे हे त्यांच्या पारखी नजरेतून सुटले नाही. त्यावेळी डीएनए दोन धाग्यांनी बनलेला आहे की तीन धाग्यांनी बनलेला आहे यावर काथ्याकूट सुरू होता. ‘फोटो-५१’ मुळे तो दोन धाग्यांनी बनला आहे हे सिद्ध झाले. अॅडेनाइन, ग्वानाइन, थायमाइन, सायटोसाइन या दोन धाग्यांच्या बाहेर असतील की आत असतील यावरही काथ्याकूट सुरू होता. याच फोटोने ते आत आहेत नि:संदिग्धपणे सिद्ध केले. नत्रयुक्त पदार्थांच्या दोन जोड्यांमधील अंतर या फोटोमध्ये अचूक कळते. दहा जोड्यानंतर डीएनएच्या धाग्याचे एक वेटोळे पूर्ण होतो हेही लक्षात येते. एका ‘फोटो-५१’मुळे सगळीच माहिती मिळाली. १९५३ साली ‘नेचर’मध्ये वॉटसन-क्रिक यांचा पेपर प्रसिद्ध झाला. त्याच्या पाठोपाठ फ्रँकलिन यांचा क्ष-किरण विवर्तनावरील पेपर प्रसिद्ध झाला. सर्वांना वाटले वॉटसन-क्रिक यांच्या डीएनए प्रतिकृतीला सिद्ध करणारा पुरावा होता! खरंतर त्या फोटोवरूनच ते अचूक मॉडेल तयार करू शकले होते!
बिपीन देशमाने
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org