तो काळ होता जगातील दोन महासत्ता अमेरिका व सोव्हिएत युनियन मधिल शीतयुद्धाचा, एकमेकांवर कुरघोडी करत वर्चस्व गाजविण्याचा. अंतराळात मानव पाठविणे, ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके पटकावणे वा प्रयोगशाळेत नवीन मूलद्रव्य तयार करणे असो प्रत्येक क्षेत्रात टोकाची स्पर्धा होती. डबनिअमच्या अस्तित्वाची चाहूल लागली याच काळात (१९६७साली) सोव्हिएत युनियनच्या मॉस्को जवळील डबनास्थित जे.आय.एन.आर संस्थेतील शास्त्रज्ञांच्या पथकाने अमेरिशिअम-२४३ वर निऑन-२२ आयन्सचा मारा करून १०५ अणुक्रमांक असलेल्या मूलद्रव्याच्या अणूंची निर्मिती केली. याच सुमारास अमेरिकेतील बर्कलेस्थित कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने हेच मूलद्रव्य निर्माण करण्यासाठी रशियन पथकाचे तंत्र वापरले; पण अपयश आल्याने कॅलिफोíनअम-२४९  वर नायट्रोजन-१५ च्या आयन्सचा मारा करून हेच मूलद्रव्य अत्यल्प प्रमाणात प्रयोगशाळेत तयार केले. अशा रीतीने दोन्ही देशांकडून या मूलद्रव्याच्या शोधाचे श्रेय मिळविण्यासाठी व नामकरणासाठी अहमहमिका सुरू झाली. तब्बल ३० वर्ष ही लढाई चालू राहिली व ट्रान्सफर्मिअम युद्धाचा एक भाग बनली. अखेर १९७७ साली आयुपॅकने या मूलद्रव्याची जिथे प्रथम निर्मिती झाली त्या मॉस्कोजवळील डब्ना गावाच्या सन्मानार्थ याचे नामकरण डबनिअम केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डबनिअम निसर्गात न आढळणारे, कृत्रिम व किरणोसर्गी मूलद्रव्य आहे. ते अत्यंत अस्थिर असून त्याची १३ समस्थानिके ज्ञात आहेत व आणखी तीन समस्थानिके असण्याची शक्यता वर्तवली जाते. डबनिअम-२६८ हा समस्थानिक सर्वात स्थिर असून त्याचा अर्धायुष्यकाल फक्त २८ तासांचा आहे. अत्यल्प निर्मितीचे प्रमाण व अल्प अर्धायुष्यकाल यामुळे त्याच्या संशोधनावर मर्यादा आल्याने या मूलद्रव्याची विशेष माहिती उपलब्ध नाही. सद्धांतिकदृष्टया डबनिअम हा पाचव्या गणातील संक्रमणधातूचा सदस्य असल्यामुळे त्याचे बरेच गुणधर्म पाचव्या गणातील मूलद्रव्यांप्रमाणे असण्याची शक्यता असून सापेक्षवादी परिणामांमुळे काही विसंगतीं अपेक्षित आहेत. त्याचे रासायनिक गुणधर्म बरेचसे त्याच्या गणातील निओबिअमशी जुळतात परंतु टँटलमशी फारकत घेतात. तो घन स्वरूपातील धातू असावा व त्याच्या अणूंची रचना त्याच्या गणातील मूलद्रव्यांप्रमाणे असण्याची शक्यता आहे. डबनिअमचा उपयोग मात्र वैज्ञानिक संशोधनापुरता मर्यादित आहे.

– मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dubnium chemical element
First published on: 06-12-2018 at 00:04 IST