दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेतील ‘मूर स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग’मध्ये मॉचली आणि एकर्ट या द्वयीने एका अतिजलद गणनयंत्राला- संगणकाला – जन्म दिला. या संगणकाचे नाव होते ‘एनिअ‍ॅक’! लष्करी कारणांसाठी बनवला गेलेला हा एनिअ‍ॅक संगणक, जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक होता. यापूर्वीचे संगणक कप्पी, दंतचक्रे अशा यांत्रिक भागांचा वापर करून गणिते सोडवत असत. परंतु एनिअ‍ॅक आपली आकडेमोड ही संपूर्ण इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारा करत असे. महायुद्धाच्या समाप्तीनंतर १५ फेब्रुवारी १९४६ रोजी अधिकृतरीत्या हा संगणक राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इलेक्ट्रॉनिक संगणकातील विविध आज्ञावलींची अंमलबजावणी ही त्यातील विद्युत मंडलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संयोजनाद्वारे (कॉम्बिनेशन) घडून येते. आज्ञावलीतील प्रत्येक आदेशानुसार संगणकातील विविध विद्युत मंडलांची उघडझाप केली जाऊन, त्याद्वारे आज्ञावलीचे पालन केले जाते. विद्युत मंडले नियंत्रित करण्यासाठी या एनिअ‍ॅक संगणकामध्ये सुमारे अठरा हजार निर्वात नळ्या (व्हॅक्यूम टय़ूब), सत्तर हजार रेझिस्टर, दहा हजार कॅपेसिटर, सहा हजार स्वीच, दीड हजार रिले इत्यादी इलेक्ट्रॉनिक भागांचा समावेश होता. चाळीस पॅनेलने बनलेल्या या संगणकाने सुमारे १२० चौरस मीटर जागा व्यापली होती. हा संगणक सेकंदाला सुमारे पाच हजार बेरजा करू शकत होता. या संगणकाची विजेची गरज होती सुमारे १६० किलोवॅट. निर्वात नळ्यांचे मूलभूत तत्त्व हे उष्णतेमुळे उत्सर्जति होणाऱ्या इलेक्ट्रॉनवर आधारलेले असल्यामुळे या संगणकात प्रचंड उष्णता निर्माण होत असे.

त्यानंतर १९५०च्या दशकात निर्वात नळ्यांना, अर्धवाहकांचा (सेमिकंडक्टर) उपयोग केलेल्या ट्रान्झिस्टरचा पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे संगणकांचा आकार लहान झाला आणि संगणकांची दुसरी पिढी जन्माला आली. या ट्रान्झिस्टरमधील इलेक्ट्रॉनच्या उत्सर्जनाचा उष्णतेशी संबंध नसल्याने वातानुकूलनाची गरजही संपली. १९५८ साली इंटेग्रेटेड सíकटचा शोध लागल्याने एका छोटय़ाशा इलेक्ट्रॉनिक चिपवर हजारो ट्रान्झिस्टर बसवता येऊ लागले. इंटेग्रेटेड सíकटमुळे संगणकाची तिसरी पिढी निर्माण होऊन, आता ट्रान्झिस्टरचा आकार तर आणखी लहान झालाच, परंतु आकडेमोडीचा वेगही मोठय़ा प्रमाणात वाढला. यानंतर १९७१ सालापासून ‘व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड सíकट’ या तंत्रज्ञानाचा वापर सुरू होऊन, एका चिपवर अक्षरश: लाखो ट्रान्झिस्टर बसवता येऊ लागले. यामुळे            संगणकाचा चौथ्या (म्हणजेच आजच्या) पिढीत प्रवेश झाला.

– मकरंद भोसले मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electronic computer akp
First published on: 18-12-2019 at 02:16 IST