राष्ट्रीय विज्ञान दिना(२८ फेब्रुवारी)च्या सर्वाना शुभेच्छा! विज्ञान म्हणजे सभोवतालचे निरीक्षण करून मानवाने मिळवलेल्या माहितीवर आपल्या बुद्धिमत्तेने प्रक्रिया, विचार आणि चिंतन करून त्याचे ज्ञानात केलेले रूपांतर. म्हणजे विज्ञान हे सभोवतालच्या नैसर्गिक पद्धतीने घडणाऱ्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक घटनांमागील कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न होता. त्यातून विविध प्रकारच्या विज्ञानांचा जन्म झाला. मानवी जीवन सुसह्य़ बनवण्यासाठी विज्ञान साहाय्य करू लागले.

मानवाच्या आयुष्यात पाणी, हवा, अग्नी, ऊर्जा, वनस्पती, लाकूड, दगड, प्राणी, पक्षी या सर्व गोष्टी आपल्याबरोबरच किंवा आपल्या मागे-पुढे अस्तित्वात आल्या अथवा आपल्याला ज्ञात झाल्या. यांच्यामधील सहअस्तित्व निसर्गाने निर्माण केले. हे सारे सजीवांसाठी मुबलक होते. म्हणून इतर प्राण्यांप्रमाणे मनुष्य कोणताही संचय करीत नव्हता. ‘सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या नियमाने सक्षम जगत होता आणि अक्षम मृत्युमुखी पडत होता.

मानवाने हळूहळू आपल्या बौद्धिक क्षमतेवर प्रगती केली. आपल्या बुद्धिमत्तेने इथल्या नैसर्गिक स्रोतांपासून कृत्रिम जग निर्माण करायला सुरुवात केली. या कृत्रिम जगाच्या निर्मितीची सर्व गुणसूत्रे तयार करताना मानवाला त्या जगाच्या विनाशाची किंवा ते हळूहळू लयाला जाण्याची यंत्रणा मात्र बनवता आली नाही. निसर्गाने उत्पत्ती आणि लय यांची सूत्रबद्ध रचना केली आहे. परंतु मानवी निर्मितीमध्ये कालबद्धता नाही, किंबहुना ते सर्व चिरकाल उपयोगी अवस्थेत टिकणारेही नाही. तरीही बुद्धिमत्तेच्या जिवावर आपण अजूनही ‘प्रगती’ला चिरंतनत्व देण्यासाठी अनेकविध प्रकारे संशोधन करीत आहोत. आपण विज्ञानाच्या मदतीने अनेक मूलभूत स्रोतांना अत्यंत क्लिष्ट पद्धतीने उपयोगहीन बनवले आहे. काही नैसर्गिक चक्रांमध्ये ढवळाढवळ केली आहे आणि त्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलला आहे.

पर्यावरणाच्या विविध प्रकारच्या अभ्यासाने हे लक्षात आले आहे. विविध विज्ञान प्रकारांनी समृद्ध झालेल्या पर्यावरणविज्ञानाच्या अभ्यासाने आणि संशोधनाने आपण पर्यावरणाची केलेली हानी लक्षात येणार आहे, त्याच्यावरच्या उपाययोजना ठरवता येणार आहेत आणि त्या उपयोगात आणून निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन करता येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर विज्ञानजागृती होणे आवश्यक आहे. ‘जय पर्यावरणविज्ञान!’ हा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा नारा आहे.

– विद्याधर वालावलकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org