‘विकर’ (एन्झाइम) ही समस्त सजीवांतील जैविक क्रिया चालू ठेवणारी वैशिष्टय़पूर्ण रसायने आहेत. विकरांवरील संशोधनाची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी झाली. सन १८१२ साली जर्मनीच्या गोट्लिब् किर्शहोफ्  याने बार्लीच्या अंकुरणाऱ्या बियांत, पिष्टमय पदार्थाचे विघटन करून त्याचे साखरेत रूपांतर करणारा पदार्थ अस्तित्वात असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर १८३३ साली अन्सेल्म पायेन आणि जियाँ-फ्रँकाय पेर्सोझ या फ्रेंच संशोधकांनी हा पदार्थ या बियांतून वेगळाही केला. या संशोधकांनी मोड आलेल्या बार्लीच्या बियांचा पाण्यात अर्क काढला व त्यात अल्कोहोल टाकून अवक्षेपणाद्वारे (प्रेसिपिटेशन) त्यातून हा पांढरा पदार्थ मिळवला. ‘डायास्टेज’ या नावे ओळखला गेलेला हा ‘विकर’ अनेक कडधान्यांत अस्तित्वात असल्याचे १८७० च्या दशकात केल्या गेलेल्या संशोधनात आढळले. इतकेच नव्हे, तर लाळेतून तसेच प्राण्यांच्या स्वादुपिंडांतूनही हा विकर वेगळा केला गेला. डायास्टेजच्या शोधानंतर शारीरिक क्रियांशी संबंध असलेल्या अशा अनेक विकरांचा शोध लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राण्यांच्या शरीरातील विविध क्रियांत भाग घेणारे हे विकर मोठय़ा रेणूंचे छोटय़ा रेणूंत विघटन करून पचनक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावतात. मद्यनिर्मितीतील किण्वन (फर्मेटेशन), पाव आंबवणे यांसारख्या क्रियांतही ते सहभागी असतात. हे विकर, ज्यावर कार्य करायचे आहे, त्या कार्यद्रव्याबद्दल अतिशय चोखंदळ असतात. त्यांचे हे वैशिष्टय़ दाखवण्यासाठी १८९४ साली जर्मन शास्त्रज्ञ एमिल फिशर याने विकरांना कुलपाची, तर कार्यद्रव्याला किल्लीची उपमा दिली. विकरांचे मुख्य काम उत्प्रेरकाचे (कॅटॅलिस्ट)! त्यांच्यामुळे जैविक क्रियांना लागणाऱ्या ऊर्जेची गरज कमी होते आणि त्या क्रिया अत्यंत जलद गतीने पार पडतात.

विकरांचा कार्यविषयक तपशील कळण्याच्या दृष्टीने अमेरिकी संशोधक जेम्स सम्नेर याने महत्त्वाचे संशोधन केले. १९२६ साली सम्नेर याने स्फटिकीकरणाद्वारे अबईच्या बियांतून (जॅक बीन) पाणी आणि अ‍ॅसिटोनच्या साहाय्याने ‘युरिएज’ हा, युरियाचे विघटन करणारा विकर वेगळा करून दाखवला. त्यानंतर सस्तन प्राण्यांच्या यकृतात सापडणारा, हायड्रोजन पेरॉक्साइडचे विघटन करणारा ‘कॅटॅलेज’ हा विकरही १९३७ साली स्फटिकीकरणाद्वारे त्याने वेगळा केला. स्फटिकाच्या स्वरूपातील विकर मिळाल्याने, विकरांची त्रिमितीय रचना अभ्यासता आली आणि विकर हे मूलत: प्रथिने असल्याचे स्पष्ट झाले. या संशोधनासाठी जेम्स सम्नेर याला १९४६ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले.

– डॉ. रमेश महाजन

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enzyme mpg
First published on: 26-08-2019 at 00:12 IST