मराठी भाषेच्या लेखनात आणि बोलण्यात वारंवार होणाऱ्या चुकांचा आणि त्या चुका का टाळाव्यात, त्या चुकांऐवजी योग्य शब्द, वाक्यरचना कोणत्या याचे दिग्दर्शन मी करणार आहे.

पुढील वाक्य पाहा- त्या समारंभाला खूप लोकं जमली होती. लोकं- ‘क’ वर अनुस्वार दिल्यामुळे त्या शब्दाचे खरे रूप लोके होते. मराठीत अकारान्त, नपुसकिलगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते. जसे झाड-नाम, नपुसकिलगी एकवचन, झाडे-झाडं, अनेकवचन अनौपचारिक लेखनात आणि बोलण्यातही एकाराऐवजी शेवटचे अक्षर आघातयुक्त लिहिले व उच्चारले जाते. त्या शेवटच्या अक्षराचा – ‘क’चा- आघातयुक्त उच्चार त्या अक्षरावर एकाराऐवजी अनुस्वार देऊन लिहिला जातो- म्हणजे शेवटच्या अक्षराचा उच्चार झाडं, बाळं, मुलं – अ चा पूर्ण उच्चार. लोकं (लोके) हा शब्दच मराठीत नाही. लोक (नाम पुल्लिंगी अनेकवचनी) हा खरा शब्द आहे. पण बहुतेक मराठी भाषक आणि मराठी लिहिणारेही हा शब्द ‘लोकं’ असाच उच्चारतात आणि लिहितात. ‘लोकं’ हा शब्द पुल्लिंगी, अनेकवचनी आहे, तो नपुसकिलगी अनेकवचनी (लोके-लोकं) असा नाही. वरील वाक्य असे हवे- त्या समारंभाला खूप लोक जमले होते.

दुसरी एक चूक लिहिण्यात वारंवार होते, पण बोलताना तो शब्द आपण बरोबर उच्चारतो. तो शब्द आहे- अग, ग-ग चा उच्चार सर्वच मराठी भाषक आघातयुक्तच करतात, पण लेखनात ‘अगं, गं अशी रूपे सर्वत्र आढळतात. ‘ग’ या अक्षराचा आघातयुक्त उच्चार म्हणजे लेखनात ‘ग’वर अनुस्वार असा गैरसमज आपल्या मनात असावा! एक लक्षात घ्यावे, की हे शब्द अगं-अगे, ग-गे असे एकारयुक्त नाहीत. त्यामुळे लेखनात त्या अक्षरावर अनुस्वार देऊ नये. अग, ग असेच लेखन करावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यास्मिन शेख