हिमनद्या म्हणजे अतिशीत तापमानामुळे पाणी गोठून अनेक वर्षे साठलेला बर्फ. हिमनद्या ही विशिष्ट सूक्ष्मजीवांची परमसीमा परिसंस्था आहे. हे सूक्ष्मजीव बर्फाच्या पृष्ठभागावर, आत आणि खोलवरदेखील वाढू शकतात. हिमनद्यांमधील सूक्ष्मजीवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिकमी तापमान, नीलकिरणांचा मारा आणि अल्प प्रमाणात असणारी पोषकद्रव्ये; अशा प्रतिकूल परिस्थितीतही ते बर्फात सुप्तावस्थेत जिवंत राहतात. हे सूक्ष्मजीव हिमनदीच्या परिसंस्थेसाठी महत्त्वाचे घटक असतात.
हवामान बदलांमुळे वाढलेल्या तापमानामुळे हिमनद्या वितळत आहेत. त्यांतील वितळलेल्या बर्फाच्या विश्लेषणात प्रथिने आढळल्याने त्यांत सजीवांचे विशेषत: सूक्ष्मजीवांचे अस्तित्व आहे, हे स्पष्ट झाले. वितळलेल्या हिमनद्या भूतकाळातील हवामान, पर्यावरण व त्यातील सजीव यांच्या माहितीचा उत्तम स्राोत असून त्या प्राचीन हवामान व त्यात झालेले बदल यांचा अभ्यास व भविष्यातील बदलांच्या अंदाजासाठी उपयुक्त आहेत. हिमनद्यांमधील बर्फात सुमारे १५ हजार वर्षे जुन्या सूक्ष्मजीवांची नोंद आहे.
यात अनेक नवीन सूक्ष्मजीवांचा शोध लागला आहे. त्यामध्ये जिवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस), शैवाल (अल्गी), बुरशी (फंगस) आणि अतिसूक्ष्म आदिजिवाणू (आर्किया) इत्यादींचा समावेश आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, यातील ९८ टक्के सूक्ष्मजीव नवीन जाती व प्रजातींचे आहेत. सर्वसाधारणपणे जंथिनोबॅक्टेरियम, पोलॅरोमोनास, स्फिंगोमोनास, फ्लेवोबॅक्टेरियम आणि मिथाईलोबॅक्टेरियम या वंशातील सूक्ष्मजीव हिमनद्यांमध्ये आढळतात.
सायक्रोफाइल्स गटातील सायक्रोबॅक्टर, मोरॅक्झेला आणि स्युडोअल्टेरोमोनास हे जिवाणू शून्यापेक्षा कमी तापमानातही सक्रिय असल्याचे आढळले आहे. जिवाणूंच्या २७ हजार नवीन प्रजाती घातक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बर्फामध्ये सुप्तावस्थेत असलेले दहा हजारांहून अधिक वर्षांचे जुने जिवाणू वितळलेल्या हिमनद्यांमध्ये सक्रिय दिसून आले आहेत. एखादा पदार्थ नैसर्गिकरीत्या सजीवांमध्ये आढळत नाही, पण तो बाहेरून सजीवांमध्ये प्रवेश करतो, त्याला झेनोबायोटिक म्हणतात. अशा स्वरूपाचे सूक्ष्मजीवही वितळलेल्या हिमनद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात.
हिमनद्यांमधील सूक्ष्मजीव बर्फातील जैव-भू-रासायनिक चक्राचा विशेषत: गंधकाच्या चक्राचा एक महत्त्वाचा भाग असून ते पोषकद्रव्ये आणि इतर घटकांसाठी उपयुक्त ठरले आहेत. वितळलेल्या बर्फाबरोबर वाहत आलेले काही नवीन जिवाणू व विषाणू सक्रिय होऊन त्यांच्यामुळे नवीन आजार उद्भवू शकतात, तसेच दुर्मीळ आजारांवर उपायदेखील सापडू शकतात, त्यामुळे हिमनद्यांमधील जिवाणूंवर जगभर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे. काही जिवाणू वितळलेल्या हिमनद्यांमध्ये फारकाळ जिवंत राहू शकत नाहीत; पण त्यांची घातक गुणसूत्रे इतर जिवाणूंमध्ये प्रवेश करून आरोग्यास घातक जिवाणूंची निर्मिती मात्र नक्की होऊ शकते!
– अनघा शिराळकर, मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org