भूजलाचा वापर करताना त्याचे पुनर्भरण कसे होईल, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. भूजलाचा नुसताच उपसा केला गेला तर त्याची पातळी आणि गुणवत्ता दोन्ही खालावतात. हे टाळण्यासाठी भूजलाचे पुनर्भरण आवश्यक ठरते. भूजलाच्या उपशापेक्षा आणि बाष्पीभवनाद्वारे होणाऱ्या व्ययापेक्षा जलधरात पोहोचणारे पाणी जेव्हा जास्त असते, तेव्हा पुनर्भरण होते. भूजलाचे पुनर्भरण हे नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही पद्धतीने होऊ शकते. बर्फ वितळून त्याचे पाणी आणि पावसाचे पाणी जमिनीत पोहोचते. ते जलधरामध्ये झिरपून पुनर्भरण होते. काही प्रमाणात नद्या आणि तलावांचे पाणीदेखील जमिनीत झिरपते आणि मर्यादित प्रमाणात पुनर्भरण होते.

पावसाचे पाणी जमिनीखाली झिरपते तेव्हा जमिनीखालचा मातीचा थर जर पाण्याने संपृक्त झाला तर पाणी अजून खाली झिरपत जाते. जेव्हा जलधराच्या भागापर्यंत पाणी पोहोचून जलधराचा भाग पाण्याने पूर्णत: संपृक्त होतो; तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने पुनर्भरण असे म्हणतात. मानवी हस्तक्षेपामुळे (उदा.- जंगलतोड, नैसर्गिक जमिनीवर फरसबंदी करणे, आणि अनियंत्रित विकास यांमुळे) भूजलाच्या नैसर्गिक पुनर्भरणात अडथळा निर्माण होतो. कारण पाणी झिरपण्याचा वेग कमी होतो. पृष्ठभागावरील प्रवाह (रनऑफ) वाढतो. त्यामुळे पुनर्भरण कमी होते.

पाणथळ जागादेखील यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा नैसर्गिक पुनर्भरण कमी प्रमाणात होते तेव्हा कृत्रिम पुनर्भरणाची गरज निर्माण होते. डोंगरावरून पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण करून ते पाणी मर्यादित क्षेत्रात झिरपायला मदत होते, चर पद्धतीमध्ये समोरच्या बाजूने उताराच्या जमिनीवर बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवले जाते याद्वारे जमिनीतील ओलावा टिकून राहायला मदत होते.

पाणी अडवण्यासाठी जाळीच्या सांगाड्यात दगड घालून पात्रात आडवा बांध घातला जातो. यास गॅबियन बंधारा म्हणतात. अतिरिक्त पाणी या बंधाऱ्यावरून वाहून जाते. बाकीचे पाणी अडवले जाऊन त्यापैकी काही पाणी जमिनीत मुरते. याशिवाय पाझर तलाव हे कृत्रिमरीत्या तयार केले जातात. यामध्ये मातीचा पोत, पारगम्यता (पर्मिअॅबिलिटी), याशिवाय तलावाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या विहिरींची संख्या आणि लागवडयोग्य जमिनीचे प्रमाण हे घटक विचारात घेतले जातात. पुनर्भरण कूपिका (रिचार्ज शाफ्ट) ही पुनर्भरणाची अजून एक महत्त्वाची पद्धत आहे. याशिवाय पुनर्भरण विहिरीद्वारे पाणी भूपृष्ठाखाली सोडले जाते. शहरी भागात जमीन इमारतीच्या छताच्या व त्यावर पडणाऱ्या पावसाच्या मोजमापानुसार शोषखड्डे तयार केले जातात. तसेच कूपनलिकांचा वापर करून देखील खोलवर असणाऱ्या भूजल साठ्यांचे पुनर्भरण केले जाते.

चित्र सौजन्य : smartcentregroup.Com

डॉ. योगिता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org