जर्मनीच्या हाइन्रिश हर्ट्झ याने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रेडिओलहरींची निर्मिती करून दाखवली. या रेडिओलहरी म्हणजे एक प्रकारचा प्रकाशच. फक्त दीर्घ तरंगलांबीचा आणि डोळ्यांना दिसू न शकणारा. या रेडिओलहरी धातूच्या पृष्ठभागावरून परावर्तित होत असल्याचे हर्ट्झला दिसून आले. रेडिओलहरींच्या याच गुणधर्मावर रडारचे कार्य चालते. रडारच्या निर्मितीचे श्रेय जर्मन संशोधक क्रिस्टियान हुल्समेयेर याच्याकडे जाते. आपण बनवलेल्या या वैशिष्टय़पूर्ण उपकरणाला त्याने ‘टेलिमोबिलोस्कोप’ म्हणून संबोधले होते. हुल्समेयेरच्या टेलिमोबिलोस्कोपमध्ये रेडिओलहरींची निर्मिती स्फुल्लिंगाद्वारे (स्पार्क) होत असे. यातून सुमारे पन्नास सेंटिमीटर लहरलांबी असणाऱ्या रेडिओलहरी स्पंदांच्या स्वरूपात निर्माण होत असत. नरसाळ्याचा आकार असणाऱ्या एका प्रक्षेपकाद्वारे त्या दूरवर पाठवल्या जात. या लहरी दूरच्या धातूच्या वस्तूवर आदळून परत येत. हुल्समेयेरच्या उपकरणातील तारांपासून तयार केलेल्या, उभ्या आकाराच्या ग्राहक अँटेनाकडून त्या टिपल्या जात व त्यावरील यंत्रणेद्वारे घंटा वाजत असे. या रेडिओलहरी टिपण्यासाठी वापरली जात असलेली ग्राहक अँटेना हव्या त्या दिशेला फिरवता येत असे. या उपकरणाचे पहिले जाहीर प्रदर्शन हुल्समेयेरने १९०४ सालच्या मे महिन्यात, कलोन येथील ऱ्हाइन नदीवरील एका पुलावरून केले. नदीतून प्रवास करणारे एखादे जहाज जेव्हा पुलाच्या दिशेने यायचे, तेव्हा उपकरणाद्वारे सोडल्या गेलेल्या रेडिओलहरी त्यावर आपटून परत येत व उपकरणाला जोडलेली घंटा वाजू लागे. हुल्समेयेरचे हे उपकरण तीन किलोमीटर अंतरापर्यंतची जहाजे टिपू शकत असे. हुल्समेयेरच्या मते हे उपकरण जहाजांचे अपघात टाळण्यासाठी उपयुक्त ठरणार होते.

कालांतराने हुल्समेयेर आपल्या या उपकरणाद्वारे सोप्या पद्धतीने जहाजाचे आपल्यापासूनचे अंतरही मोजू शकला. उंच ठिकाणावरून त्या जहाजाची आपल्या उपकरणाद्वारे जागा नोंदवायची. टिपलेले जहाज किती अंश खाली आहे, ते मोजायचे. त्यानंतर पाण्याच्या पृष्ठभागापासूनची आपल्या उपकरणाची उंची लक्षात घ्यायची आणि साध्या त्रिकोणमितीवरून त्या जहाजाचे आपल्यापासूनचे अंतर मोजायचे. हुल्समेयेरने आपल्या उपकरणासाठी विविध देशांकडून पेटंटही मिळवले. परंतु भविष्यात वाहतुकीपासून ते हवामानापर्यंतच्या विविध क्षेत्रांत उपयुक्त ठरलेले हे उपकरण, तेव्हा मात्र त्याचे महत्त्व न कळल्याने दुर्लक्षित राहिले. अखेर १९२०-३०च्या दशकात शत्रूच्या बॉम्बवाहू लष्करी विमानांचा वेध घेण्यासाठी त्याचा उपयोग होऊ  लागला व रडार तंत्रज्ञानाच्या पुढील वाटचालीला सुरुवात झाली.

– डॉ. राजीव चिटणीस मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org