‘शाकाहारी सूक्ष्मजीव’ हे शीर्षक वाचून थोडे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. खरे तर हे सजीव त्यांच्या प्रकारानुसार पोषणाच्या बाबतीत अतिशय लवचीक, अनुकूलनक्षम आणि गुंतागुंतीचे असतात. त्यांना आवश्यक पोषणतत्त्वे (कार्बन, नायट्रोजन, विविध क्षार, जीवनसत्त्वे आणि वाढीस पूरक द्रव्ये) कोणत्याही स्राोतांमधून मिळाली, तरी ते स्वीकारण्यास सक्षम असतात. म्हणूनच अशा सूक्ष्मजीवांना ‘सर्वभक्ष्यी पोषणक्षम’ असे संबोधले जाते. प्रयोगशाळांत सूक्ष्मजीव वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमात कोणते घटक वापरले जातात, ही माध्यमे प्राणिजन्य उत्पत्तीची (उदा.- मांस, रक्त, पित्त) आणि वनस्पती-आधारित (गहू, सोया, मका, साखर, ऊस, बीट इत्यादी) या दोन प्रकारांत विभागली जातात.

पारंपरिक सूक्ष्मजीवशास्त्रात प्राणिजन्य माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. मात्र १९८० च्या दशकात युरोपात ‘मॅडकाऊ डिसीज’ ज्याला शास्त्रीय भाषेत ‘बोवाइन- स्पॉन्जिफॉर्म- एन्सेफॅलोपॅथी’ (बी.एस.ई.) असे म्हणतात. अशा रोगट प्राण्यांमधून मानवात पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांच्या घटनांमुळे प्राणीजन्य माध्यमांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न निर्माण झाले. ट्रान्समिसिबल स्पॉन्जिफॉर्म- एन्सेफॅलोपॅथी (टी.एस.ई.) आणि बी.एस.ई. हे मेंदूवरील संक्रामक, प्राणघातक विकार असून प्राणीजन्य पोषण माध्यमांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर शंका उपस्थित करतात. यामुळे काही वेळा जैवसुरक्षेचा धोका उद्भवतो. यामुळे वनस्पतीजन्य पोषणमाध्यमांच्या गरजेला चालना मिळाली.

प्राणिविरहित पोषणमाध्यमांचा वापर प्रायोगिक पातळीवर प्रथम लुई पाश्चर यांनी १८६० साली केला. मात्र हे प्रयोगशाळांमध्ये रूढ झाले नाही. पुढे १९७०च्या दशकात सोया व गहू यांसारख्या वनस्पतींपासून मिळणाऱ्या प्रथिनांचा वापर करून व्यावहारिक पोषणमाध्यमे तयार होऊ लागली. यामध्ये ‘ट्रिप्टिकेस सोयाअगार’सारख्या माध्यमांचा समावेश होतो. तसेच म्युलर हिंटन अगार, सोयाबीन-केसिन डाइजेस्ट अगार आणि मॉल्ट एक्स्ट्रॅक्ट अगारसारख्या वनस्पतीजन्य माध्यमांवर बॅसिलस सटिलिस, साल्मोनेला टायफिम्युरियम, कँडिडा अल्बिकन्स, अॅस्परजिलस ब्राझिलीएन्सिस व सॅक्रोमायसेस सेर्व्हिसिये यांसारख्या जीवसृष्टीची समृद्ध वाढ अनुभवता येते.

प्राणीपालन, कत्तल आदी प्रक्रियांपासून पूर्णपणे मुक्तता मिळाल्यामुळे या माध्यमांचा वापर अधिक स्वीकारार्ह ठरतो. युरोपियन कमिशनच्या अहवालानुसार, वनस्पती आधारित जैवउत्पादन प्रक्रियेदरम्यान हरितगृह वायूंचे उत्सर्जन सरासरी ४५ टक्क्यांनी घटते. जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती, लशींचा विकास आणि अन्न-निदान क्षेत्रांतील वाढत्या वापरामुळे वनस्पतीजन्य माध्यमांचा जागतिक वाटा झपाट्याने वाढतो आहे. मात्र, काही विशेष पोषणविषयक गरजा असलेले जिवाणू अशा माध्यमांवर अपेक्षित वाढ दर्शवत नाहीत. एकाच वनस्पतीपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये सूक्ष्म रासायनिक फरक असू शकतात, त्यामुळे सातत्य राखणे हे आव्हानात्मक ठरते.

डॉ. गिरीश महाजन

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org