कुतूहल : समुद्रातील उष्णजल निर्गममार्ग

भूतलावर ज्याप्रमाणे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड वापरून सेंद्रिय कार्बन तयार होतो,

hot water in ocean warmest ocean water
समुद्रातील उष्णजल निर्गममार्ग

शास्त्रज्ञांना १९७७ मध्ये प्रशांत महासागराच्या तळातून विवरांवाटे गरम, वितळलेला क्षारयुक्त द्रव बाहेर पडताना प्रथमच दिसला. तळाशी सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने तेथे स्वयंपोषी सजीव नसतात, मात्र काळोखात राहणारे काही जीव आढळतात. जमिनीवर ज्याप्रमाणे गरम पाण्याचे नैसर्गिक झरे असतात, तसेच उष्णजल निर्गममार्ग (हायड्रोथर्मल व्हेन्ट) भूकंपप्रवण प्रदेशात शक्यतो समुद्र-मध्यावरच्या कडांवर आढळतात. अशा ठिकाणी पृथ्वीच्या ‘टॅक्टॉनिक प्लेट्स’ (भूविवर्तनी थर) एकमेकांपासून दूर सरकत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी शीलारस (मॅग्मा) भेगांमधून समुद्रतळापासून पृष्ठभागावर उसळू पाहतो. तेथील स्थानिक उष्ण तापमानामुळे विविध रासायनिक प्रक्रिया होऊन ऑक्सिजन, मॅग्नेशिअम, सल्फेट, इत्यादी रासायनिक घटक पाण्यातून बाहेर पडू लागतात. हायड्रोथर्मल व्हेन्टच्या ठिकाणी रासायनिक घटक अधिक तप्त आणि आम्लधर्मी होतात. त्यामुळे आजूबाजूच्या खडकातून लोह, जस्त, तांबे आणि कोबाल्ट यांसारखे धातू झिरपतात. समुद्रतळाच्या या निर्गम मार्गानी पुन्हा एकवार तप्त द्रव उसळी घेत असतात. हे फवारे काळे किंवा पांढरे अशा दोन प्रकारचे दिसतात. त्यामुळे यांना ब्लॅक किंवा व्हाइट स्मोकर्स असे म्हणतात. यांचे तापमान ४०० अंश सेल्सिअस इतके जास्त असले तरी समुद्रतळाशी असलेल्या जास्त दाबामुळे पाणी उकळत नाही. चार अब्ज वर्षांपासून कार्यरत असणारे निर्गममार्ग पृथ्वी तयार होत असतानाच्या पर्यावरणाशी साधर्म्य दाखवतात. असेच उष्णजल निर्गम ‘युरोपा’ या गुरूच्या चंद्रावर आणि ‘इंसेलाडस’ या शनीच्या चंद्रावरदेखील आहेत. 

येथे जलद रासायनिक अभिक्रिया घडत असतात. सल्फरसारखी मूलद्रव्ये अवक्षेपित होतात किंवा द्रवातून बाहेर पडून त्यांचे उंच मनोरे तयार होतात. हे मनोरे खनिजांनी समृद्ध असतात. याशिवाय समुद्रतळाशी हे अवक्षेप साचून तेथेही खनिजसमृद्ध समुद्रतळ निर्माण होतो. त्यातील काही द्रावणांवर सूक्ष्म जीव ताव मारतात. त्यामुळे येथे सौर-ऊर्जा नसली तरी रासायनिक संश्लेषण होणारे वेगळय़ा स्वरूपाचे अन्नजाळे तयार होते. भूतलावर ज्याप्रमाणे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड वापरून सेंद्रिय कार्बन तयार होतो, त्याऐवजी येथे सागरी जिवाणू रसायनांचा वापर करून इतर जीवसृष्टीला अन्नपुरवठा करतात. उदाहरणार्थ, हायड्रोजन सल्फाइड हा ऊर्जास्रोत वापरून, चयापचय सुरू ठेवून असे जिवाणू टय़ूबवर्म, कोळंब्या, शिणाणे अशा प्राण्यांना जगण्यासाठी मदत करतात.

– डॉ. नंदिनी वि. देशमुख

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 03:28 IST
Next Story
कुतूहल: आंतरराष्ट्रीय सील दिन
Exit mobile version