scorecardresearch

सागरी मैल – अंतर मोजण्याचं एकक

एकेकाळी समुद्राच्या पृष्ठभागावर अंतर मोजणं हे एक आव्हानच होतं!

एकेकाळी समुद्राच्या पृष्ठभागावर अंतर मोजणं हे एक आव्हानच होतं! चहूकडे पाणीच पाणी असल्यावर अंतर मोजायचं तरी कसं? यावरही पंधराव्या शतकातल्या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला. आधी विषुववृत्त ३६० अंशांमध्ये विभागलं. त्या प्रत्येक अंशाचे पुन्हा साठ भाग केले. हा भाग म्हणजेच नॉटिकल माइल किंवा सागरी मल. याची लांबी असते ६०८० फूट किंवा १८५३ मीटर असते.

आता या माहितीचा उपयोग करून जहाजाचा वेग काढायची एक पद्धत कोणीतरी शोधून काढली. एक लांब दोरी घेऊन तिला दर ५० फुटांवर एक गाठ (नॉट) मारायची. तिच्या एका टोकाला एक लाकडाचा छोटासा ओंडका (लॉग) बांधायचा.

वेग मोजायचा असेल तेव्हा हा ओंडका पाण्यात टाकायचा आणि तो दोरीबाहेर खेचून न्यायला लागला की, एका वाळूच्या घडय़ाळाने बरोब्बर अर्ध मिनिट मोजायचं आणि त्या अध्र्या मिनिटात किती गाठी बाहेर जातात ते मोजायचं. अध्र्या मिनिटात जितक्या गाठी बाहेर गेल्या तितके ‘नॉट्स’ किंवा ताशी तितके सागरी मल जहाजाचा वेग.

जहाजाचा वेग हल्ली अतिशय प्रगत इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी मोजतात, पण त्या उपकरणाला आजही ‘स्पीड लॉग’ असेच म्हणतात आणि वेगही ‘नॉट्स’मध्येच मोजतात. या पद्धतीचा विमानाशी काही संबंध नसला तरीही विमानाचा वेगही ‘नॉट्स’मध्ये मोजला जातो.

फ्रेंचांनी मात्र दशमान पद्धतीला अनुसरून पृथ्वीच्या ध्रुवापासून विषुववृत्तापर्यंतच्या अंतराचे १०,००० भाग केले. या एका भागाला ‘किलोमीटर’ हे नाव देण्यात आलं. यावरून हे लक्षात येईल की या दोन्ही मापन पद्धतींनी पृथ्वीच्या परिघाचा एक भाग वापरून मूळ एकक निवडलं आहे. त्यापकी सागरी मल हा वर्तुळाच्या ३६० अंशाचा साठावा भाग असल्यामुळे स्फेरिकल ट्रिगॉनॉमेट्रीमध्ये (गोलपृष्ठावरच्या त्रिकोणमितीमध्ये) अंशामधली कोनात्मक अंतरे (अँग्युलर डिस्टन्सेस) सहजपणे मलामध्ये परिवर्तित करता येतात. म्हणून इतरत्र सर्वत्र मेट्रिक पद्धतीचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर होत असला तरी, समुद्रपृष्ठावरली अंतरे मोजण्यासाठी ‘सागरी मल’ हेच एकक आजही वापरलं जातं.

कॅ. सुनील सुळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

 

पन्नालाल पटेल- विचार

१९८५ चा ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारल्यावर आपले विचार व्यक्त करताना पन्नालालजी म्हणाले, ‘या सुशिक्षित प्रतिष्ठित जमावापुढे बोलताना मला संकोच वाटतो. कारण मी जेमतेम पाचवीपर्यंत शिकलेला आहे. मी एक गावंढळ माणूस असून रोटी कमविण्यासाठी दिवसाचे तेरा तास काम केले आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मी ही सहा आकडी रक्कम (दीड लाख रुपये बक्षीस) पाहात आहे. या आकडय़ांचे माझ्यावर दडपण आलेले आहे..

मी गुजरातच्या एका खेडय़ात राहणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा मी साहित्याचं नावदेखील कधी ऐकलं नव्हतं की साहित्याचं महत्त्वही मला माहिती नव्हतं. माझ्या शालेय जीवनात मला गुजरातीतील विख्यात कवी उमाशंकर जोशी यांच्याबरोबर पाच र्वष एका बाकावर बसण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं. आम्ही बरोबर शिकलो. बरोबर खेळलो. पुढे त्यांनी मला साहित्य लिहिण्यासाठी प्रोत्साहित केलं. सुरुवातीला मी कविता लिहिल्या. मग मात्र अखंडपणे कथालेखन सुरू झाले. मग लघुकथा माझे अनुभव व्यक्त करण्यासाठी मला लहान वाटू लागल्या. तेव्हा मी कादंबरीकार झालो. ‘मळेला जीव’ या कादंबरीने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. माझ्या लेखनाला ‘चमत्कार’ समजले जाऊ लागले. आजही आपण पाहत आहातच की, ज्ञानपीठ पुरस्कार हा खऱ्या अर्थाने एक चमत्कारच म्हटला पाहिजे..  मी माझ्या पौराणिक कादंबऱ्यांतून हे प्रतिपादित केलं आहे की, भारतीय संस्कृती ही मोक्षार्थी नाही तर जीवनार्थी आहे. मानवाला मृत्यूरहित जीवन प्राप्त करण्याची आस आहे. त्याला सनातन जीवन आध्यात्मिक मार्गाने प्राप्त करून घ्यायचं आहे. या अर्थाने मी भारतीय संस्कृतीला जीवनलक्षी म्हटलेलं आहे.

‘मानविनी भवाई’ची रचना १९४६ साली झाली आणि १९४७  या ऐतिहासिक वर्षांत तिचं प्रकाशन झालं. त्या वेळी माझ्या हातून काही तरी अलौकिक लिहिलं गेलंय याची मला कल्पनादेखील नव्हती. साहित्य शब्दनिर्मित आहे. शब्द हीच साहित्यिकाची संपत्ती आहे. माझाही या ‘शब्दा’शी परिचय आहे. आपल्या अर्धशतकाच्या साहित्ययात्रेत मी ‘शब्द’ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण इथे मी खुलेपणाने मान्य करतो की शब्दावर अद्याप माझी हुकूमत नाहीय. त्याची उत्पत्ती कुठून होते आणि साहित्यिकाच्या मनात तो अचानक कसा प्रकट होतो, हे सगळंच रहस्यमय आहे.’’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to count distance of sea

ताज्या बातम्या