भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ : प्रा. व्ही. पुरी

प्रा. विश्वंभर पुरी यांचा जन्म ९ डिसेंबर १९०९ साली ‘नगीना’ उत्तर प्रदेश येथे झाला.

प्रा. व्ही. पुरी

प्रा. विश्वंभर पुरी यांचा जन्म ९ डिसेंबर १९०९ साली ‘नगीना’ उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण देवनागरी स्कूल मीरत येथे झाले. आग्रा येथील आग्रा कॉलेज येथे त्यांनी वनस्पतिशास्त्र हा विषय घेऊन एम.एस्सी.ची पदवी प्रथम क्रमांकाने संपादन केली. आग्रा महाविद्यालयामध्ये असताना त्यांचा संपर्क प्रा. माहेश्वरी यांच्या बरोबर आला. प्रा. माहेश्वरी यांनी डॉ. पुरी यांना फ्लोरल अ‍ॅनॉटॉमी या विषयात संशोधन करण्याचा सल्ला दिला. इंटरमिजीएट विद्यार्थ्यांना मीरत येथे शिकवत असताना अतिशय सामान्य साधनांचा उपयोग करून त्यांनी संशोधनाची सुरुवात केली. त्यांनी १९३९-४० साली आग्रा विश्वविद्यालयात डी.एस्सी. प्राप्त केली. त्यांच्या अथक प्रयत्नांनी मीरत कॉलेजमध्ये बी.एस्सी.साठी जीवशास्त्र आणि एम.एस्सी.साठी वनस्पतिशास्त्र या विषयांची सुरुवात झाली.

एक हाडाचा शिक्षक म्हणून ख्याती असलेले प्रा. पुरी एक सुवक्ता, विचारांची सखोलता, ज्ञाता म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे ठाम मत होते की योग्य आणि परिपूर्ण शिक्षण याचे महत्त्व संशोधनापेक्षा आयुष्यात जास्त मौलिक स्वरूपाचे आहे. त्यांनी स्वत: इमानदारी, एकात्मता आणि वक्तशीरपणा या गुणांवर भर दिला. त्यांना विद्यार्थ्यांबद्दल खूप आत्मीयता होती. ते विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करायचे आणि प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २५ विद्यार्थाना डॉक्टरेट मिळाली. त्यांच्यापकी अनेक भारतात व परदेशात उच्च पदावर शिक्षक किंवा संशोधक म्हणून कार्यरत आहेत.

प्रा. पुरी यांना भारतातील विज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठीचे सर्व सन्मान मिळाले. १९६० साली स्टॉकहोम, स्वीडन येथे झालेल्या सहाव्या इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेससाठी त्यांना सन्मानाचे आमंत्रण होते. १९६६ साली त्यांना अतिप्रतिष्ठित बिरबल सहानी सुवर्ण पदक मिळाले. त्याचप्रमाणे १९६४ आणि १९७५ साली झालेल्या इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेससाठी त्यांना आमंत्रण होते. बाराव्या इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेससाठी इव्होल्यूशन ऑफ फ्लॉवर या परिसंवादाचे आयोजन करण्याची आणि अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ९ ऑक्टोबर २००२ साली मीरत येथे त्यांचा मृत्यू झाला.

– डॉ. सी. एस. लट्टू
मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२
  office@mavipamumbai.org

 

 

 

जिनोआचे इटलीत विलीनीकरण

जिनोआ शहर त्याच्या गौरवशाली इतिहासामुळे ‘ला सुपर्बा’ म्हणजे सर्वोत्तम या नावानेही ओळखले जाते. या शहराच्या वैभवशाली, संपन्न कला, संगीत आणि खाद्यसंस्कृतीमुळे त्याला युरोपच्या सांस्कृतिक राजधानीचा मान मिळाला. १००५ साली जिनोआत स्वतंत्र नगरराज्य स्थापन झाले. जिनोआचा बिशप हा या नगरराज्याचा अध्यक्ष. प्रत्यक्ष कारभार मात्र सल्लागार मंडळाने निवडलेला काऊन्सल या हुद्दय़ावरचा अधिकारी पाहत असे. तत्कालीन प्रसिद्ध इटालियन सागरी प्रजासत्ताके व्हेनिस, पिसा, अमाल्फीप्रमाणेच जिनोआही व्यापारावरच संपन्न झाले होते. जिनोआत अकराव्या शतकात प्रजासत्ताक निर्माण झाल्यावर पुढच्या पाच शतकांमध्ये बराच मोठा प्रदेशविस्तार झाला. या नव्या प्रदेशात जिनोआने आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि आपल्या मालासाठी नवीन बाजारपेठा निर्माण करून तिथे आपले व्यापारी बस्तानही बसवले. क्रुसेड्समध्येही जिनोआने आपला सहभाग ठेवला होता. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस जिनोआ आणि स्पॅनिश साम्राज्य यांच्यात संरक्षणात्मक, व्यापाराबाबत युती झाली आणि जिनोआची औद्योगिक आणि व्यापारी भरभराट झाली. सतराव्या शतकाच्या अखेरीस मात्र युरोपातील काही राज्यांचा अंमल जिनोआवर बसला आणि जिनोआचा विकास खुंटला, पीछेहाट सुरू झाली. १८१५ साली व्हिएन्ना येथे झालेल्या राज्यप्रमुखांच्या बठकीत मध्ययुगीन जिनोआ राज्य सॅव्हायच्या राज्यात विलीन करायचा ठराव झाला. त्यामुळे जिनोआचे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्व नष्ट झाले. इटालीचे राष्ट्रीयीकरण करण्यासाठी गॅरिबाल्डीने सुरू केलेली चळवळ याच दरम्यान जिनोआत सुरू झाली. पुढे १८७१ साली जिनोआ संयुक्त इटलीच्या प्रजासत्ताकात सामील झाले. १९ आणि २० व्या शतकात जिनोआचा नागरी विकास मोठय़ा प्रमाणात झाला. एक औद्योगिक केंद्र आणि विकसित बंदर याच्या जोरावर भरभराट होऊन जिनोआ हे मिलान, तुरीन यांच्याबरोबर इटलीच्या औद्योगिक त्रिकोणाचा भाग बनले. सध्या जिनोआचे बंदर पोटरे अँटिको हे भूमध्य सागरातील महत्त्वाच्या व्यापारी बंदरांपकी एक बनले आहे.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian botanical scientist vishwambhar puri

ताज्या बातम्या