scorecardresearch

Premium

कुतूहल – भारतीय रसायनशास्त्रज्ञ

जन्मभूमी भारत पण कर्मभूमी अमेरिका असणारे जीवरसायन शास्त्रज्ञ डॉ. येल्ला प्रगदा सुब्बाराव हे १९२२ मध्ये शिक्षण-संशोधनासाठी भारतातून बॉस्टन (अमेरिका) येथे गेले.

कुतूहल – भारतीय रसायनशास्त्रज्ञ

डॉ. येल्ला प्रगदा सुब्बाराव (१२ जाने. १८९५-९ ऑ. १९४८)
जन्मभूमी भारत पण कर्मभूमी अमेरिका असणारे जीवरसायन शास्त्रज्ञ डॉ. येल्ला प्रगदा सुब्बाराव हे १९२२ मध्ये शिक्षण-संशोधनासाठी भारतातून बॉस्टन (अमेरिका) येथे गेले.  
तेथे सुब्बारावांनी लेडल्रे लॅबोरेटरीत स्प्रू रोगावर संशोधन केलं. स्प्रू रोगात लहान आतडय़ामध्ये अन्न, पाणी व खनिज द्रव्यं शोषली जात नाहीत. यामुळे या रोगात पोषणातील न्यूनता दर्शविणारी लक्षणं आढळतात. स्प्रू रोगानं सुब्बाराव यांच्या भावाचं निधन झालं होतं. त्यामुळे या रोगलक्षणांतून मानवाला मुक्त करण्यासाठी संशोधन करण्याचं सुब्बाराव यांनी ठरविले. त्यांनी रक्तपरीक्षा करून रक्तातील तांबडय़ा व पांढऱ्या पेशींचे विशिष्ट प्रमाण हे आरोग्यसंपन्नतेचं निदर्शक असतं, असं दाखविलं. तांबडय़ा पेशींची निर्मिती मंदावली की, शरीर निरोगी राहत नाही, असं त्यांना आढळलं. फॉलिक आम्लानं तांबडय़ा पेशींची झपाटय़ानं वाढ होते, हेही त्यांच्या लक्षात आलं. यावरून फॉलिक आम्लाच्या न्यूनतेमुळे स्प्रू रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते, हे लक्षात आल्यावर फॉलिक आम्लातील घटकद्रव्यांचा त्यांनी शोध घेतला. यकृताच्या अर्कातून फॉलिक आम्ल मिळविणं हे खर्चीक काम असल्यानं त्यांनी कृत्रिम रीतीनं हे आम्ल तयार केलं.
फॉस्फरस संयुगांचं परीक्षण करताना यकृताच्या स्रावातील रासायनिक द्रव्यांकडे त्यांचं लक्ष गेलं. ही द्रव्यं रक्तक्षयावर रामबाण उपाय ठरू शकतील असं वाटल्यानं त्यांनी ही द्रव्यं शुद्घ रूपात वेगळी केली. पांडुरोगाच्या प्रकारात (मॅक्रोसायटिक ऑनिमियात) रुग्णाला फॉलिक आम्ल दिलं असता तांबडय़ा रक्तपेशींच्या निर्मितीत वाढ झाल्याचं सुब्बाराव यांना दिसून आलं. त्यांनी फॉलिक आम्लापासून ऑप्टिसिनासारखी द्रव्यं मिळविली आणि ल्यूकेमिया व कर्करोगावर गुणकारी ठरली. ऑरिओमायसिन (क्लोरोटेट्रासायक्लिन) हे प्रतिरोगजैविक (अँटिबायॉटिक) द्रव्य त्यांनी शोधून काढलं. ते रक्तविषयक रोगांवर गुणकारी औषध ठरलं. कर्करोगावरील औषध मेथोट्रेक्झेट शोधून काढलं. हत्तीरोगावरील हेट्राझन या औषधाचाही शोध लावला. फॉस्फरसाची उष्णतामापन पद्घती त्यांनी शोधून काढली व तिचा वैद्यकात उपयोग होऊ लागला. स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामध्ये फॉस्फोक्रिअ‍ॅटिन व अ‍ॅलडिनोसिन ट्रायफॉस्फेट (अळढ) यांचा असणारा महत्त्वाचा सहभाग संशोधनाद्वारे शोधून काढला.
लेडल्रे प्रयोगशाळेतील संशोधन विभागानं ‘सुब्बाराव मेमोरियल लायब्ररी’ स्थापन केली आहे.
शुभदा वक्टे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – पैशांचं मानसशास्त्र
मानस, एक कोडं घालते. कठीण नाही, खरं म्हणजे हे कोडं नाहीये. तीन प्रश्न आहेत. कोडं प्रश्नात नाहीये, उत्तर हे कोडं आहे. नीट ऐक आणि उगीच थिल्लरपणा न करता. अगदी तात्काळ उत्तरं दे. प्रश्न दोन भागांत आहे. त्या प्रश्नाचे काही उपप्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर एका कागदावर लिहून, ते मला न सांगता गुपचूप ठेवून दे.
समज, तुला दहा लाख रुपये एकदम मिळाले. तुला ते कुठून नि कसे मिळाले? यावर ते पैसे कसे खर्च करायचं अवलंबून असेल का? (अर्थात, नाही! – मानसचं उत्तर)
आता या प्रश्नांच्या तीन वेगवेगळ्या परिस्थितींची माहिती देते आणि पैसे कसे खर्च करणार याचे चार पर्याय देते..
(१) समज, तुला हे दहा लाख रुपये वर्षांअखेर मिळालेला बोनस असेल तर (अ) चैनीसाठी खर्च करशील (ब) गरजेच्या गोष्टींकरता खर्च करशील (क) इन्व्हेस्ट करशील (ड) अति‘सेफ’ ठिकाणी त्यांची बचत करशील.
(२) समज तुला हे दहा लाख रुपये तुझ्या प्रिय मावशी/आत्याने मरणोत्तर दिले तर.. (अ) चैनीसाठी खर्च करशील (ब) गरजेच्या गोष्टींकरता खर्चशील (क) इन्व्हेस्ट करशील (ड) अतिसेफ ठिकाणी बचत करशील.
(३) समज, तुला या दहा लाख रुपयांची लॉटरी लागली तर.. (अ)चैनीसाठी खर्च करशील (ब) गरजेच्या गोष्टींकरता खर्च करशील (क) इन्व्हेस्ट करशील
(ड) अतिशय सेफ ठिकाणी त्यांची बचत करशील.
मानसनं या तिन्ही परिस्थितीसंदर्भाचा क्षणार्धात विचार केला. (क्षणार्धात विचार करून उत्तर देणं महत्त्वाचं)
मानस प्रश्नांची उत्तर देण्यात इतका गढून गेला की, आधी मूळ प्रश्नाचं काय उत्तर दिलं हे विसरला होता.
मानसी म्हणाली, तू उत्तरं सांगण्याआधी माझा अंदाज सांगते. पहिला संदर्भ वर्षांअखेरचा बोनस. तुझं उत्तर (ब) किंवा (क) म्हणजे गरजेसाठी खर्च किंवा गुंतवणूक. दुसरा संदर्भ प्रिय मावशी/आत्याकडून मृत्युपत्राद्वारे मिळालेले दहा लाख. उत्तर (क) किंवा (ड) म्हणजे गुंतवशील किंवा सेफ ठिकाणी ठेवशील. तिसरा संदर्भ (अ) किंवा (ब) म्हणजे लॉटरी लागली तर. चैन किंवा गरजांवर खर्च.
मानस चकित होऊन म्हणाला :  होय गं! मी अशीच उत्तरं दिली. म्हणजे मनात किंचित द्वंद्व झालं ते तू सांगितलेल्या पर्यायांमध्ये होतं..  कम्माल आहे. मला वाटलं पैसे कुठून मिळाले या गोष्टीवर पैसे कसे खर्च करणार? यावर अवलंबून नसतं, असं म्हटलं होतं.
मानसचे कान धरून मानसी म्हणाली, अरे मिळालेले पैसे यांचा विनियोग करणं हे फक्त तर्कावर अवलंबून नसतं! पैसे म्हणजे केवळ नोटा किंवा कागदावरचे आकडे नव्हेत.. पैसे कमावणं नि ते खर्च करणं यामागे प्रत्येक व्यक्तीची मानसिकता असते. आपण पैसे कसे खर्च करतो यामागे ते कुठून नि कसे मिळाले त्याची छुपी मनोवृत्ती असते. अशा अनेक मनोवृत्तींपैकी एकाचा विचार इथे..
बोनस म्हणून मिळालेले पैसे थोडे स्वत:च्या आवडीनिवडीकरता किंवा गरजेच्या गोष्टीसाठी वापरतो. कारण ते कष्टाचं फळ आहे असं वाटतं.
तर कुणाच्या मृत्युपत्राद्वारे मिळालेले पैसे साधारणपणे सेफ ठिकाणी किंवा योग्य इन्व्हेस्ट करण्याची मानसिकता असते. कारण त्या पैशामागे प्रेम, आदर, आत्या-मावशीचा धाक असतो. लॉटरीचे पैसे ‘छप्पर फाडके’ मिळाले म्हणून गरज असेल तर त्याप्रमाणे पण मुख्यत: चैन करण्याकडे कल असतो..म्हणजे पैसे नुसते कागद किंवा आकडे नसतात, ती मानसिकता असते.. खरंच पैसे मिळवणं आणि खर्च करण्याचं मानसशास्त्र असतं हे माहीत नव्हतं!! तुला काय वाटलं मानसशास्त्र म्हणजे वेडय़ा लोकांचा अभ्यास!! येडाच आहेस!!
 डॉ.राजेंद्र बर्वे -drrajendrabarve@gmail.com
        
प्रबोधन पर्व – आधुनिक होणे म्हणजे राजकीय होणे
‘‘आपण ज्याला आधुनिकता म्हणतो ती आधुनिकता औद्योगीकरण व प्रबोधन यांच्या एकूण उपक्रमांतून स्फूरलेली आहे. राजकीय होणे म्हणजे आजच्या जमान्यात तरी आधुनिक होणे आहे. आधुनिक होणे म्हणजे औद्योगीकरण व प्रबोधन यांतून उदभवलेल्या जाणीवा आपल्याशा करणे. त्या जाणीवा स्वत:च्या सामाजिक व राजकीय आणि कलाव्यवहारांत अभिव्यक्त करणे, किमानपक्षी त्या तशा अभिव्यक्त होत असतात हे समाजावून घेणे, याला आधुनिक होणे असे म्हणता येईल. त्या जाणिवांचे स्वरूप व्यामिश्र आहे. कांट, हेगेल, मार्क्‍स आणि फ्रॉईड यांनी घडवलेला माणसाच्या असण्याचा व विचाराचा अर्थ तिथे केंद्रस्थानी येऊन बसतो. कुणाला मग उजाड वाळवंट दिसू लागते, तर कुणावर दाती तृण घ्यावे, हुजूर म्हणून अशी पाळी येते, तर कुणी या सर्वाचा निषेध म्हणून की काय ‘जलवाहिनी निश्चल कृष्ण, बन झुकले काठी राधा’ अशा प्रतिमा पाहू लागतात. पु. शि. रेग्यांनी वापरलेली ही प्रतिमा एका अर्थाने अभिजात परंपरेकडे (क्लासिसिझम) पुनर्गमनाचा प्रयत्न आहे. तो तसा समजावून घेणे म्हणजे आधुनिक म्हणजे राजकीय होणे असते.’’ गो. पु. देशपांडे ‘रहिमतपुरकरांची निबंधमाला -१ : नाटकी निबंध’ (डिसेंबर १९९५) या पुस्तकातील ‘आधुनिकता, राजकारण आणि नाटक’ या निबंधात आधुनिकता आणि राजकीयता यांचा परस्परसंबंध स्पष्ट करताना लिहितात – ‘‘राजकीयतेचा विचार करताना आपल्याला आधुनिकतेच्या आणखी एका वैशिष्टय़ाचा विचार करावा लागेल. ते वैशिष्टय़ प्रथमदर्शनी अजिबात राजकीय वाटत नाही किंवा वाटणार नाही, परंतु स्वायत्त राजकीय भूमिका घडण्यामध्ये त्या वैशिष्टय़ाचा फार मोठा हिस्सा आहे. आधुनिकतेने कालविषयक परिमाणे बदलून टाकली. आधुनिकपूर्व जमान्यात जेव्हा राजकारण हा स्वायत्त प्रदेश नव्हता, त्या जमान्यात कालविषयीची कल्पना निराळी होती. आधुनिकतेने ती पार बदलून टाकली.. राजकारणात आणि आधुनिकतेत काहीच शाश्वत असत नाही, चिरंतन असत नाही; अगदी प्राथमिक स्वरूपाच्या गुणावगुणाच्यापलीकडे काहीच शाश्वत राहत नाही. सारांश आधुनिकतेत एक नवी काळविषयक जाणीव अनुस्यूत असते.’’

Army Faster with 5G Technology
देशाचे सैन्य ५जी तंत्रज्ञानामुळे अधिक वेगवान
jobs recruitment
नोकरीची संधी: इस्रोमधील शास्त्रज्ञ होण्याची संधी
Indian scientists have solved the mystery of X-rays emitted by black holes
भारतीय शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; कृष्णविवराजवळून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरण रहस्याचा केला उलगडा
Loksatta lokrang Documentary The art of presenting reality video medium Work Studies in Folklore and Culture
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: वास्तव मांडण्याची कला..

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian chemistry scientists

First published on: 10-12-2014 at 05:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×