डॉ. गजानन माळी
भारतात उत्तम शिक्षण देणाऱ्या आयआयटी आहेत. तितक्याच उत्तम दर्जाच्या परंतु केवळ मूलभूत विज्ञान विषयात शिक्षण देणाऱ्या संस्था काढाव्यात असे भारत सरकारला वाटले आणि मोहाली (२००७), कोलकाता (२००६), पुणे (२००६), बेहरामपूर (२०१६), तिरुपती (२००५), भोपाळ (२००८) आणि थिरुवनंतपूरम (२००८) या सात ठिकाणी भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव यांच्या प्रेरणेने या संस्था सुरू झाल्या. विज्ञानाचे पायाभूत शिक्षण देणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या या भारतातील अग्रेसर संस्था आहेत. त्यांची स्थापना भारत सरकारच्या मनुष्यबळ संसाधन मंत्रालयाने केली आणि २०१२ मध्ये या महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्था म्हणून घोषित करण्यात आल्या. संशोधन व विज्ञानाचे पायाभूत शिक्षण देणे हे आयसर संस्थांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सर्व स्वायत्त संस्था असून त्या स्वत:ची पदव्युत्तर आणि पीएच.डी. पदवी प्रदान करतात.
त्यातील एक म्हणजे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), पुणे आहे. सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय केमिकल प्रयोगशाळेच्या, इनोव्हेटिव पार्कमध्ये १००० चौ. मीटर क्षेत्रफळ जागेमध्ये वसलेल्या या संस्थेत फक्त पाच अभ्यागत प्राध्यापक आणि ४४ विद्यार्थी होते. त्या वेळच्या या लहानशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सध्या या संस्थेत १२००पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून, तज्ज्ञ अध्यापक व कर्मचारी कार्यरत आहेत. संस्थेच्या परिसरात संशोधनासाठी व वसतिगृहात राहून शिकणाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. आयसरमध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले जातात. यामध्ये विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पृथ्वी आणि वातावरण विज्ञान, गणितातील इंटिग्रेटेड पीएच.डी. व इतर पीएच.डी. कार्यक्रमदेखील येथे राबवले जातात.
आयसरमध्ये पोस्टडॉक्टरल शिक्षणदेखील उपलब्ध आहे. संस्थेमध्ये शिकणारे ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी नामांकित संशोधन संस्थांमध्ये कार्यरत आहेत. अनेक मानाचे पुरस्कार संस्थेने मिळवले आहेत. एनआयआरएफ २०२४ च्या ‘इंडिया रँकिंग’नुसार एकूण श्रेणीत ४२ क्रमांकावर आणि संशोधन संस्था श्रेणीत २९ क्रमांकावर ही संस्था आहे. ‘सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’च्या अहवालानुसार जगभरातील उत्तम ५.७ टक्के विद्यापीठांमध्ये आयसर, पुणेचे स्थान आहे. या भारतीय संस्थांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विशेष गुणवत्ता सिद्ध केली आहे.
डॉ. गजानन माळी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org