भारतात मधमाश्यापालन हा उद्योग पारंपरिक नाही. वनवासी लोक मात्र पारंपरिक पद्धती वापरून मध व मेण संकलन करीत आले आहेत. युरोपात विकसित झालेल्या तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न भारतात १८८०मध्ये झाला. त्यात थोडंच यश मिळालं. कन्याकुमारी भागात फादर न्यूटन यांनी अमेरिकन (लँगस्ट्रॉथ) पद्धतीच्या पण आकाराने लाकडी लहान पेटीचा वापर प्रथम केला.
१९३७च्या सुमाराला उत्तर प्रदेशातील कुमाऊं या पर्वतीय भागात जॉलीकोट येथे आर. एन. मट्ट यांनी आधुनिक मधमाश्या-पालनाचा पायाच घातला असे म्हणता येईल. मधपाळांच्या सहकारी संस्थेची स्थापना आणि मधमाश्यापालनविषयक त्रमासिकाची सुरुवात करण्याचं श्रेय त्यांनाच द्यावं लागेल. ‘इंडियन बी जर्नल’ या अजूनही चालू असलेल्या त्रमासिकाला ७५ वर्षांची परंपरा लाभली आहे.
१९४०मध्ये ग्रामीण उद्योगांची संकल्पना महात्मा गांधींच्या प्रयत्नाने साकार झाली व मधमाश्यापालनाला चालना मिळाली. स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५३मध्ये अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग मंडळाची स्थापना होऊन १९५६मध्ये त्याचे रूपांतर आयोगात झाले. वैकुंठभाई मेहता हे या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. त्यांच्या सल्ल्याने एस. के. कल्लापूर आणि स्वातंत्र्यसनिक श्री. सी. गं. शेंडे यांनी मधमाश्यापालन कार्यक्रमाची पायाभरणी केली. १९५६ नंतर मधपाळांची संख्या वाढत जाऊन आज दोन लाखांवर गेली आहे. १९६०च्या सुमारास पंजाबात आयात केलेल्या परदेशी मेलिफेरा जातीच्या उत्पादक मोहोळांमुळे या व्यवसायाचा विस्तार अनेक पटींनी वाढला व भारत आज एक अग्रेसर मधोत्पादक देश ठरला.
यासाठी आवश्यक असलेल्या संशोधन प्रयोगशाळेची खरी सुरुवात १९५२ साली महाबळेश्वर येथे झाली. त्यासाठी श्री. शेंडे, सुप्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ डॉ. गो. बा. देवडीकर, चिं. वि. ठकार, डॉ. र. पु. फडके यांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. या कामाचा विस्तार अखिल भारतीय पातळीवर करण्यासाठी १ नोव्हेंबर १९६२ रोजी केंद्रीय मधमाश्यापालन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना खादी ग्रामोद्योग आयोगाने केली. त्याचे मुख्यालय पुणे येथे आहे. तेथे मूलभूत आणि व्यावहारिक उपयोगाचे संशोधन होते. तेथील संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. तेथील मधमाश्यापालनविषयक ग्रंथांचे ग्रंथालय खूप समृद्ध आहे.
कृषिउद्योग व ग्रामोद्योग म्हणून मधमाश्यापालनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. नवयुवकांना यामध्ये संशोधन व विस्तार कार्यासाठी भरपूर वाव आहे.

जे देखे रवी..      ॐ-शब्दब्रह्म
ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी हा एक संपूर्ण संपन्न आणि स्वतंत्र वेदच आहे असे माझे म्हणणे आहे. ती ओवी सांगायच्या आधी ज्ञानेश्वर ॐ म्हणतात. म्हणजे अक्षर किंवा आद्याक्षर. कारण हे विरघळत नाही. हे क्षर नाही. हे आहे तरी काय? ध्वनी की कंपन की स्पंदन की तरंग? याला ध्वनी म्हणणे अवैज्ञानिकच. ध्वनी आकाशातून वायूच्या साह्याने पसरतो, पण हा ॐ पंचमहाभूताच्या आधीचा, जेव्हा आकाश आणि वायू दोन्ही नव्हते. अर्थात तरंग किंवा स्पंदन किंवा कंपन निर्वात माध्यमातून प्रवास करू शकते हे आपल्याला मायकल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाने दाखवून दिले आणि मॅक्सवेल याने गणिताच्या आधारे सिद्ध केले. याचे स्वरूप होते, विद्युत चुंबकत्व म्हणजे प्रकाश. हा विश्वाच्या सुरुवातीला प्रवासाला निघाला तो अजून फिरतोच आहे. चिरकालीन म्हणजे काळ सुरू झाला तेव्हापासूनचा. काळ कधी सुरू झाला, तर एक कल्पना असे म्हणते की जगाच्या सुरवातीला एकलत्व होते (Singularity) जे फुटले, पसरले आणि त्यातून विश्व निर्माण झाले तेव्हा काळ सुरू झाला. त्या एकलत्वाला आपल्यात ब्रह्म म्हणतात. ब्रह्म म्हणजे पसरणे म्हणून हे नाव. ब्रह्म का पसरते तर त्यातल्या चैतन्याचे ऋणभार आणि घनभार एकमेकांशी समतुल्य असल्यामुळे शांतपणे नांदत होते. पुढे अचानक अनाकलनीय कारणामुळे काहीतरी बिनसले. समतुल्यता मोडीत निघाली आणि अणुस्फोट ज्या तत्त्वावर होतो त्याच तत्त्वावर प्रचंड उष्णता निर्माण होऊन ब्रह्मात स्फोट झाला. अर्थात शांत असतानासुद्धा ब्रह्म एका अर्थाने जिवंत होते आणि प्रत्येक जिवंत वस्तू स्पंदत असते.
या स्पंदनावर बोट ठेवता येत नाही, पण ते असतेच असते. ब्रह्मावर मात्र बोट ठेवता येते. कितीही सूक्ष्म आणि टिंबासारखे असले तरी त्याला एक शारीरिक अस्तित्व असते. याला एकलत्व म्हणतात म्हणून हा आकडा एक असतो. याच्यातल्या स्पंदनावर बोट ठेवता येत नाही म्हणून त्या कल्पनेला शून्य म्हणतात. ॐ हे या अस्तित्वहीन शून्याचे प्रतीक आहे अशी एक कल्पना आहे. ब्रह्म हा आकडा १ आणि ॐ म्हणजे शून्य म्हटले की मग आकडेमोड सुरू होऊन असंख्य आकडे मांडता येतात. फुटलेल्या ब्रह्मातून निघालेले हे असंख्य आकडे म्हणजे हे विश्व. ह्या विश्वात ॐचे स्पंदनही पसरते.
पुढे वातावरणात आल्यावर ह्याचे रूपांतर ध्वनीमध्ये होऊ शकते. मग शब्द व्याकरण, वाक्य, गद्य, पद्य, कविता, संगीत, गाणे या रूपाने हे मूळचे अक्षर नटते. केवळ योग्य तऱ्हेने ॐ म्हणून ॐकाराची साधना केली तर शांत वाटून मन उल्हसित होते अशीही कल्पना आहे. डोंबिवलीच्या केतकर नावाच्या अभ्यासकाने ॐकार साधनेने गायकी सुधारते, असे शास्त्रशुद्ध संशोधन करून पुणे विद्यापीठाची पीएचडीही मिळवली आहे.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – मनोविकार : भाग – ४/ न्यूनगंड
लक्षणे- शारीरिकदृष्टय़ा प्रकृती ठणठणीत असूनही शारीरिक कष्टाचे काम होणार नाही अशी कल्पना करून घेणे. लौकिक, शिक्षण व्यवस्थित झालेले असूनही त्याचा उपयोग करण्याची संधी मिळाली असता ती नाकारणे. स्वत:मध्ये नसलेले न्यून किंवा कमीपणा शोधून त्यामुळे सदैव माघार घेणे. गर्दीपासून लांब रहाणे. थोडक्यात प्रकाश आला असता डोळे मिटणे.
कारणे – आर्थिक-सामाजिक-कौटुंबिक परिस्थितीमुळे वेळेवर वर येण्याची संधी न मिळणे. सवंगडय़ांच्या प्रगतीसोबत आपली प्रगती होत नसल्यामुळे अधिक खचणे. हस्तमैथुन, निद्रानाश, पांडुता, नपुंसकत्व, व्यायामाचा अभाव. खेळांची अजिबात सवय नसणे.
शरीर व परीक्षण – पुरुषांची पूर्ण परीक्षा न्यूनगंडाकरिता करावी.
अनुभविक उपचार – बदामकल्प किंवा अश्वगंधापाक किंवा च्यवनप्राश तीन चमचे सकाळ सायंकाळ दुधाबरोबर घ्यावा. चंद्रप्रभा, ब्राह्मीवटी व सुवर्णमाक्षिकादि वटी प्र. ३ गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. जेवणानंतर अश्वगंधारिष्ट चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. सकाळी अंघोळीच्या अगोदर व रात्री झोपताना सर्वागाला शतावरी सिद्ध तेलाने मसाज करावा. सूर्यनमस्कार, वज्रासन, प्राणायाम, मैदानी खेळ, कुस्ती; काहीच नाही तर बागकाम अशा सारखे मोकळ्या हवेतील उपक्रम नियमितपणे करावेत. आपल्यापेक्षा खूप वरच्या स्तरातील लोकांच्या संगतीत रहाण्याऐवजी बरोबरीच्या लोकांच्या संपर्कात राहून आपला विकास अधिकाधिक करावा.
रुग्णालयीन उपचार – सर्व शरीराला शतावरी सिद्ध तेलाने मसाज करून घ्यावा. टबमध्ये अवगाहस्वेद किंवा मोठय़ा पेटीमध्ये सर्वागस्वेद ऋतुमानाला धरून करावा. मग वाजीकरणाकरिता सांगितलेले सशास्त्र वाततपिक औषधी प्रयोग सुरू करावेत.
पथ्यापथ्य – स्वत:ला प्रिय वाटेल, आवडेल अशा वातावरणाची निवड करून जेवणखाण करावे. मनाचा सर्वश्रेष्ठ गुण सत्त्व अशा गुणाची म्हणजे सात्त्विक राहणीची कास धरावी. मनाच्या  षडरिपुंपासून कटाक्षाने लांब राहावे. शरीर संपादनाकडे लक्ष द्यावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – २९ मे
१९२१ >  कवी, ग्रंथसंपादक व ललितलेखक अशोक देवदत्त टिळक यांचा जन्म. रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक यांचे ते नातू. लक्ष्मीबाईंच्या ‘स्मृतिचित्रे’ची अभिनव आवृत्ती त्यांनी संपादित केली आणि रेव्हरंड टिळकांवरचे ‘चालता बोलता चमत्कार’ हे पुस्तक लिहिले. ‘अशोकदेवी’, ‘सावल्या’, ‘रुप्याची झालर’ आणि ‘कविता’ हे त्यांचे कवितासंग्रह तसेच ‘विषय आजचाच’, ‘असे केले तर’ , ‘मित्रहो’, ‘जरा वेगळा अँगल’, ‘चवैतुहि’, ‘टक्करमाळ’ – हे लेखसंग्रह प्रकाशित झाले. ‘मन केवढं केवढं’ हा व्यक्तिचित्रसंग्रह, तसेच स्मृतिचित्रांतून सुटलेले धागे गुंफणारे ‘शांतिसदन’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते. त्यांचे निधन २००९च्या सप्टेंबरात झाले.
१९५२ > ‘सोव्हिएत रशियाचा सर्वागीण सवरेदय’ आणि ‘नवचीन’ ही दोन्ही साम्यवादी राष्ट्रांबद्दल भरपूर माहिती देणारी पुस्तके भारतीय स्वातंत्र्याच्या उष:कालीच लिहिणारे केशव गोविंद गोखले यांचे निधन. पेशाने वकील व निस्सीम गांधीभक्त असलेल्या गोखले यांनी भारतीय स्वातंत्र्यलढय़ात आठ वेळा तुरुंगवास भोगला व देशभक्तांच्या चरित्रवर्णनाचे ‘आर्यावर्तातील रत्ने’ हे पुस्तकही लिहिले.
– संजय वझरेकर