नवजात स्वायत्त देश मॉरिशसचे पंतप्रधान अनेरुद जगनॉथ यांच्याविरोधात झालेला उठाव मोडून काढण्यासाठी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय नौदल आणि लष्करास तिकडे पाठविले. उठाव मोडला गेल्यावर, १९८३ साली जगनॉथ यांनी पुन्हा निवडणुका घेतल्या. त्यात बहुमताने निवडून आल्यावर ते पुन्हा पंतप्रधानपदी स्थानापन्न झाले. १९९२ पर्यंतच्या जगनॉथ यांच्या कार्यकाळात त्यांनी औद्योगिकीकरणावर भर देऊन पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी पर्यटनाच्या नवनवीन सुविधा सुरू केल्या. १२ मार्च १९९२ रोजी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २४ वर्षांनी मॉरिशसच्या राज्यघटनेत बदल केला गेला आणि तिथे प्रजासत्ताक राज्यव्यवस्था स्थापन झाली. कासम उतीम हे राष्ट्राध्यक्ष झाले. राष्ट्राध्यक्ष हे नवीन पद निर्माण झाले तरी प्रजासत्ताक मॉरिशसचे पंतप्रधान हेच प्रमुख कार्यकारी पद राहिले आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊन त्यात ‘मिलिटंट सोश्ॉलिस्ट मुव्हमेंट’ या पक्षाचे सरकार बहुमत मिळवून सत्तेवर आले. या पक्षाचे प्रविंदकुमार जगनॉथ हे पाच वर्षांसाठी मॉरिशसचे पंतप्रधान आणि पृथ्वीराजसिंग रूपुन हे देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉरिशसची अर्थव्यवस्था मुख्यत: ऊस उत्पादन, पर्यटन, वस्त्रोद्योग यावर निर्भर असून ९० टक्के  शेतजमिनीवर ऊसाची लागवड केली जाते. निर्यातजन्य उत्पन्नांपैकी २५ टक्के  उत्पन्न ऊसापासून मिळते. याशिवाय मॉरिशस सरकार सिमेंट उत्पादन, विद्युत उपकरणे, हॉटेल व्यवसायाचे आधुनिकीकरण करीत आहे. आफ्रिकन देशांपैकी मोजक्या देशांची अर्थव्यवस्था विकसित झाली. त्यापैकी सार्वभौम प्रजासत्ताक मॉरिशस हा एक आहे. मॉरिशसची जनता अनेक विभिन्न वंशसमूहांची मिळून बनली आहे. त्यामध्ये भारत, आफ्रिका, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया येथून आलेल्या रहिवाशांचे वंशज आहेत. येथील राजभाषा इंग्रजी असली तरी फ्रेंच भाषेचाही वापर येथे मोठय़ा प्रमाणात होतो. येथील तेरा लाख लोकसंख्येपैकी हिंदू धर्मीय ५२ टक्के, ख्रिस्ती धर्मीय २७ टक्के आणि इस्लाम धर्मीय १५ टक्के आहेत.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about mauritius crowd zws
First published on: 04-05-2021 at 03:13 IST