कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून संगणक असुरक्षित केला जाऊ शकतो. हे काम एआय-पॉवर्ड मालवेअरच्या साहाय्याने केले जाते. एखाद्या संस्थेतील संगणकीय अंकीय मालमत्तेभोवती सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी सुरक्षा तज्ज्ञांनी फायरवॉल, हल्ला प्रतिबंध प्रणाली (आयपीएस), अनुमती नियंत्रण पद्धती (अॅक्सेस कंट्रोल सिस्टीम), बहुघटकीय प्रमाणीकरण (मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन) यासारख्या सुरक्षा प्रणाली आणि तंत्रे विकसित केली आहेत. पण जगात १०० टक्के सुरक्षित असे काहीही नाही. अट्टल गुन्हेगार हल्ला करण्यासाठी कोणताही मार्ग वापरतात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनाने त्यांना आता जणू काही जादूचा दिवाच मिळाला आहे. पूर्वी संगणक शर्विलकाला वैयक्तिकरीत्या प्रत्येक प्रणालीवर जाऊन फोड करावी लागत असे. पण आता कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त प्रणाली आपोआप एकाच वेळी बऱ्याच संगणक जालांमध्ये (नेटवर्कमध्ये) जाऊन तिकडील कमकुवत क्षेत्रे शोधून त्यांवर हल्ल्याची योजना करू शकते. त्याशिवाय ज्ञात सुरक्षा प्रणाल्या समजून घेऊन आपल्या प्रणालीत अनुरूप बदल करून न पकडले जाता त्या लक्ष्याला कुचकामी बनवू शकते. हा कल्पनाविलास न राहता प्रत्यक्षात घडत आहे.

आयबीएमच्या शास्त्रज्ञांनी प्रायोगिक तत्त्वावर विकसित केलेली कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त सुरक्षाभेदक प्रणाली, ‘डीप लॉकर’ तेच करते. ती सामान्य विदा म्हणून लक्ष्य संस्थेच्या जालावर पाठवली जाते, आणि जोपर्यंत इच्छित लक्ष्य गाठले जात नाही, तोपर्यंत कूटबद्ध केलेली तिची प्रणाली प्रकट करत नाही.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta kutuhal artificial intelligence in cyber crime amy
First published on: 22-05-2024 at 05:41 IST