सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबिअल टेक्नॉलॉजी – आयएमटेक) ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील संशोधन संस्था आहे. तिची स्थापना १९८४ साली चंदीगड इथे झाली. या संस्थेची सुरुवात एका प्रयोगशाळेपासून झाली जिचे भविष्यात सूक्ष्मजीवतंत्रज्ञानातील अग्रगण्य संस्थेत रूपांतर झाले. सप्टेंबर १९८९मध्ये ४७ एकर जागेवरील सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण इमारतींमध्ये या संस्थेचे स्थलांतर झाले. यामध्ये २२ एकरवर प्रयोगशाळा आणि २५ एकरवर निवासी इमारती आहेत.
आण्विक जीवशास्त्र, सूक्ष्मजीव अनुवांशिकी, पेशी जीवशास्त्र, प्रतिकारशास्त्र, प्रथिन विज्ञान व तंत्रज्ञान, किण्वन तंत्रज्ञान आणि उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांवर मूलभूत व उपयोजना केंद्रित संशोधन या संस्थेत होते. प्रतिकृती (क्लोनिंग), पुनर्संयोजकाची अभिव्यक्ती (एक्स्प्रेशन ऑफ रिकॉम्बिनंट), प्रथिने विकसित करण्याची अभियांत्रिकी प्रक्रिया, क्ष- किरण स्फटिकशास्त्राद्वारे प्रथिनांची रचना, औषध व लस निर्मितीसाठी रोगजन्य आण्विक सूक्ष्मजीवशास्त्राची निर्मिती, प्रतिकारशक्तीचा अभ्यास, किण्व (यिस्ट) आनुवंशिकताशास्त्र, वैशिष्ट्यपूर्ण विकरांच्या क्रियांसाठी सूक्ष्मजीवांची तपासणी आणि त्यातील चांगल्या प्रजातींमध्ये सुधारणा, जैव माहितीशास्त्र व अत्याधुनिक संगणकीय जैवशास्त्र, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण व त्यांची आनुवंशिकता इत्यादींच्या संशोधनासाठी आवश्यक उद्याोग व्यवस्थापन व बौद्धिक संपदा संरक्षण या संस्थेत उपलब्ध आहे. संस्था जागतिक स्तरावरील अत्याधुनिक सोयींनी सज्ज आहे. यामध्ये विविध प्रमाणातील किण्वित्र (फरमेंटर) सुविधांसाठी प्रयोगशाळा ते पथदर्शी प्रमाण (लॅब टू पायलटस्केल), पेशींचे संवर्धन, सूक्ष्मजीवांची निगराणी-जतन आणि ओळख, प्रयोगासाठी आवश्यक प्राण्यांचे निवासस्थान, संशोधन व संगणक सुविधा, माहिती स्राोतांनी समृद्ध ग्रंथालय, इत्यादी अत्याधुनिक सुविधा या संस्थेत उपलब्ध आहेत.
नैसर्गिक, पुन:संयोजित आणि गुठळीविशिष्ट (क्लॉट स्पेसिफिक) असलेले स्ट्रेप्टोकायनेज या जीवनावश्यक व जीवनरक्षक औषधांच्या निर्मितीचे पेटंट या संस्थेने मिळवले आहे. औषधांच्या शोधांचे संगणकीय स्राोत हे वेबपोर्टल या संस्थेने चालू केले आहे. दीडशेहून अधिक मुक्त स्राोत संगणक प्रणाली, विदासंच (डेटाबेसेस) आणि वेबसाइट्स चालवणारे संगणक या संस्थेने निर्माण केले आहेत. या सर्वांचा उपयोग जगभरातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांना होतो. या संस्थेतील शास्त्रज्ञ सूक्ष्मजीवतंत्रज्ञान या विषयात उच्चशिक्षित व प्रशिक्षित असून ते अत्याधुनिक संशोधन व विकासामध्ये अग्रेसर आहेत. सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्था भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org