प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूत प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. अणूतील प्रोटॉनची संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुक्रमांक किंवा अणुअंक, न्यूट्रॉन अधिक प्रोटॉनची संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक. समस्थानिके म्हणजे समान अणुक्रमांक मात्र भिन्न अणुवस्तुमानांक म्हणजेच न्यूट्रॉन्सची संख्या वेगळी असलेले मूलद्रव्य. समस्थानिकाला इंग्रजीत आयसोटोप म्हणतात. खरं तर आयसोटोप हा ग्रीक शब्द आहे, याचा अर्थ होतो  ‘द सेम प्लेस’. आवर्तसारणीत मूलद्रव्यांना त्यांच्या अणुक्रमांकानुसार स्थान मिळालेले आहे, त्यामुळे मूलद्रव्याला कितीही समस्थानिके असली तरी अणुक्रमांक समान असल्याने मूळ मूलद्रव्यांची आणि समस्थानिकांची आवर्तसारणीतील जागा एकच असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हायड्रोजन या मूलद्रव्याला दोन समस्थानिके आहेत. त्यातील पहिले डय़ुटेरिअम. हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसतो (याला हायड्रोजन १ अथवा प्रोटियम असेही म्हटले जाते) तर डय़ुटेरिअममध्ये एक न्यूट्रॉन असतो त्यामुळे त्याचा अणुभार वाढतो.

‘हेरॉल्ड उरे’ या अमेरिकन भौतिकी-रसायनशास्त्रज्ञाने १९३१ साली डय़ुटेरिअम या हायड्रोजनच्या समस्थानिकाचा शोध लावला. या शोधासाठी १९३४ मध्ये त्यांना मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले. अथांग सागर हा डय़ुटेरियमचा एक स्रोत आहे. समुद्रामधल्या

पाण्यात ६४२० हायड्रोजनच्या अणूंपाठी एक अणू हा डय़ुटेरिअमचा असतो. अणुभट्टीमध्ये आण्विक प्रकिया सुरू करण्यासाठी डय़ुटेरॉनचा वापर होतो. डय़ुटेरॉन म्हणजे डय़ुटेरियमचे केंद्रक.

अणुभट्टीमध्ये निरंतर तयार होणारी उष्णता काढून त्याचे विजेत रूपांतर करण्यासाठी जड पाणी वापरले जाते. जड पाण्यामध्ये हायड्रोजनची जागा डय़ुटेरिअम घेते. भारतात हे जड पाणी बनविण्याचे आठ प्रकल्प आहेत, त्यामुळे जड पाणी बनविण्यात भारत अग्रेसर आहे आणि अभिमानाची गोष्ट अशी की, इतर देशांना आपण जड पाणी पुरवितो.

अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन कणांचा वेग मर्यादित करण्याकरितादेखील डय़ुटेरियम हे समस्थानिक महत्त्वाचे आहे. तसेच विविध रेणूंची रचना जाणण्यासाठी एन.एम.आर. म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (केंद्रकीय चुंबकीय संस्पंदन).

या मूलद्रव्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्म अभ्यासण्याच्या प्रणालीमध्ये डय़ुटेरियम वापरतात. त्यात हायड्रोजनयुक्त द्रावण चालत नाही. अशा वेळेस, हायड्रोजनसारखेच वागणारे हे समस्थानिक फार उपयोगाला येते.

– डॉ. विद्यागौरी लेले ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे आले ते रमले.. : संस्कृत पंडित शक राजा रुद्रदामन

उत्तर चीनमधील झिंगझियांग प्रांतातील भटक्या, रानटी युह-ची टोळ्यांपैकी शक जमातीच्या लोकांनी कझाकिस्तान, इराण आणि पुढे अफगाणिस्तानमाग्रे भारतीय प्रदेशात आपली राज्ये स्थापन केली. इराणी, ग्रीक आणि नंतर भारतीय लोकांशी संबंध आल्यावर मूळचे रानटी जमातीचे शक बरेचसे सुसंस्कृत बनले. सर्वाधिक पराक्रमी शक राजा रुद्रदामन याला हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचे आकर्षण होते. त्याने हिंदू धर्म स्वीकारल्यावर बहुतेक सर्व शक समाजाने हिंदू धर्म स्वीकारून भारतीय जीवनशैलीचा स्वीकार केला. रुद्रदामनने स्वत: आणि बहुतेक सर्व भारतीय शक पुरुषांनी हिंदू स्त्रियांशी विवाह करून त्यांनी भारतीय लोकांशी रोटी-बेटी व्यवहार अंगीकारले. रुद्रदामनने त्याच्या मुलीचा विवाह सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचा मुलगा वसिष्टीपुत्र सातकर्णी याच्याशी लावला. रुद्रदामन हिंदू परंपरेने गोदान, धनदान करीत असे. हिंदू धर्म स्वीकारल्यावर हे शक भारतीय जीवनशैलीत एवढे समरस झाले की त्यांचे वेगळे अस्तित्वच संपले. ही गोष्ट त्यांच्या नावावरूनही लक्षात येते. जयदामन (रुद्रदामनचे वडील), रुद्रदामन, जमदश्री, जीवदामन, रुद्रसिंह, रुद्रसेन वगैरे नावे पूर्वाश्रमीच्या रानटी मंगोल वंशाच्या लोकांची आहेत हे अविश्वसनीय वाटण्यासारखेच आहे!

राजा रुद्रदामन स्वत: संस्कृत पंडित होता. संस्कृतच्या व्याकरणाचा त्याने विशेष अभ्यास केला होता. त्याने संस्कृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेला जुनागढ येथील शिलालेख ‘गिरनार लेख’ या नावाने ओळखला जातो. संस्कृत भाषेत शिलालेख लिहिणारा रुद्रदामन हा पहिला राजा. रुद्रदामनचा जुनागढात सापडलेला हा शिलालेख केवळ एक इतिहास संशोधनाचे साधन म्हणूनच नव्हे तर संस्कृत भाषेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आजही अभ्यासला जातो. संस्कृत भाषा पंडित असलेला हा विद्वान राजा भारतीय संगीत, विज्ञान आणि न्यायदान या क्षेत्रांमध्येही निपुण होता. रुद्रदामनाच्या कारकीर्दीत स्वत:ला ‘यवनेश्वर’ म्हणवून घेणारा एक ग्रीक कवी गुजरातेत राहिला. रुद्रदामनच्या सल्ल्याने त्याने ‘यवनजातक’ हा भारतीय खगोलशास्त्रावरचा संस्कृतातला ग्रंथ लिहिला. रुद्रदामनच्या नाण्यांवर एका बाजूला लक्ष्मीचा तर दुसऱ्या बाजूला घोडय़ाचा ठसा होता.

– सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isotopes of hydrogen deuterium
First published on: 15-01-2018 at 04:26 IST