पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध लागून ९५ वर्षे उलटली. त्यानंतर अनेक प्रतिजैविकांचा शोध लागला. त्यामुळे अनेक जिवाणूजन्य आजार आटोक्यात आले. परंतु प्रतिजैविकांच्या अनिर्बंध वापरामुळे प्रतिजैविक-प्रतिरोधक रोगजंतू तयार झाले. बरीचशी प्रतिजैविके ही जमिनीतील सूक्ष्म जीवांपासून मिळवलेली आहेत. सागरात अगणित सूक्ष्म जीवांचे भांडार आहे. त्याचा पुरेसा अभ्यास झालेला नाही.
समुद्राच्या तळाशी असंख्य सूक्ष्म जीव अतिशय कठीण, बिकट, टोकाच्या परिस्थितीत राहतात. समुद्राच्या तळाशी पाण्याच्या स्तंभाचा प्रचंड दाब असतो. पाण्यात क्षार तर असतातच. समुद्रतळाशी तापमान अतिशय कमी असते तर काही ठिकाणी ते अतिशय जास्त असते. ऑक्सिजन व प्रकाशाची कमतरता किंवा संपूर्ण अभाव असू शकतो. अशा बिकट परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी ही मंडळी नक्कीच काही प्रतिजैविके आणि इतर उपयुक्त रसायने तयार करीत असणार. या सागरी सूक्ष्म जीव खजिन्याला शास्त्रज्ञांचा अजून फारसा हात लागलेला नाही.
सूक्ष्म जीवांचा शोध घेण्यासाठी खोल समुद्रापर्यंत पोहोचणे कठीण असते. शिवाय या जिवाणूंना प्रयोगशाळेत वाढवणेही फार कठीण असते. खोल समुद्रातील बिकट वातावरण या सूक्ष्म जीवांच्या वाढीसाठी पोषक असते. असे वातावरण प्रयोगशाळेत तयार करणे हे जिकिरीचे आणि आव्हानात्मक असते! तरीही सागरी जैवतंत्रज्ञांनी या आव्हानांवर मात करून अनेक जिवाणू आणि कवके यांचा अभ्यास केला आहे. हे सूक्ष्म जीव प्रयोगशाळेत वाढवून, कोणती रोगजंतू-विरोधी रसायने तयार करतात हे अभ्यासले आहे. उदाहरणार्थ टियान या शास्त्रज्ञाने मरिनोअॅक्टिनोस्पोरा थर्मोटॉलरन्स नावाचा जिवाणू दक्षिण चीन समुद्रातून जवळजवळ ३.६८५ किलोमीटर खोलीच्या तळाशी असलेल्या काळय़ा चिखलातून शोधून काढला! त्यानंतर शास्त्रज्ञांनी या जिवाणूंनी तयार केलेले ‘मार्थियापेप्टाईड ए’ नावाचे प्रथिन शुद्ध स्वरूपात मिळवले. हे छोटे प्रथिन अनेक रोगजंतूंविरोधात काम करू शकते हे त्यांनी प्रयोगशाळेत दाखवून दिले!
असे अनेक सूक्ष्म जीव आणि त्यांनी तयार केलेली प्रतिजैविके यावर जगभरात संशोधन सुरू आहे. सध्या काही रोगजंतू कित्येक प्रतिजैविकांना जुमानत नाहीत, त्यांना पुरून उरतात! अशा नाठाळ, निगरगट्ट रोगजंतूंचा कर्दनकाळ आपल्याला सागरी तळातील जिवाणूंपासून मिळू शकतो! जगातील अनेक संशोधन संस्था आणि जैवतंत्रज्ञान कंपन्या एकमेकांशी सहकार्य करून या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर काम करत आहेत.
बिपिन देशमाने ,मराठी विज्ञान परिषद