प्रवाळ इतर प्राण्यांपेक्षा काही वेगळी, ठळक वैशिष्टय़े दाखवतात. प्रवाळांचे कठीण प्रवाळ आणि मृदू प्रवाळ असे दोन प्रकार असतात. बाह्यकंकाल असलेले कठीण प्रवाळ भित्तिका तयार करतात. मृदू प्रवाळ वनस्पतींप्रमाणे भासतात आणि लाटांसोबत हेलकावे घेतात. ते भित्तिका तयार करत नाहीत. त्यांच्या सभोवती असलेले मऊसर आवरण त्यांचे संरक्षण करते. मृदू प्रवाळांत बहुशुंडके आणि छत्रके अशी दोन रूपे असतात. प्रवाळभित्तिका तयार होण्यास लाखो वर्षांचा कालावधी लागतो. सध्या अस्तित्वात असलेल्या पृथ्वीवरील प्रवाळभित्तिका तयार होण्यास मागील २० ते ३० कोटी वर्षे लागली असावीत. अतिशय लहान असलेल्या या सागरी प्राण्यांचा आकार ०.६ सेंमीपासून ते २६ सेंमीपर्यंत असतो. या प्राण्यांना ‘बहुशुंडक’ (पॉलिप) म्हणतात. एका बहुशुंडकाचे आयुष्य दोन ते अनेक वर्षे असू शकते. हे प्राणी स्थानांतर करत नाहीत. ते सागरतळी, एका जागी आधारकावर, एकमेकांना चिकटून राहतात. सागरी पाण्यातून कॅल्शिअम काबरेनेट शोषून घेतात व त्यापासून कपासारखी रचना तयार करून त्यात राहतात. असे अनेक आकार एकत्र येऊन प्रवाळांची वसाहत तयार होते. ही संपूर्ण वसाहत एकत्रितपणे एक सजीव म्हणून कार्य करत राहते.
प्रवाळ प्रकाशसंश्लेषण करू शकत नाहीत. अन्न मिळवण्यासाठी ते शैवालाबरोबर राहतात. हे सहजीवनाचे उत्तम उदाहरण आहे. शैवालांना प्रवाळांमुळे संरक्षण आणि आधार मिळतो. त्याबदल्यात शैवाल प्रवाळांना अन्न आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. एकपेशीय शैवाल प्रवाळांच्या ऊतींमध्ये राहून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे सेंद्रिय अन्नाची निर्मिती करतात. या अन्नाचा उपयोग प्रवाळांना आवश्यक ऊर्जा निर्मितीसाठी होतो. प्रवाळ हिरव्या, पिवळय़ा, गुलाबी, जांभळय़ा अशा अनेक आकर्षक रंगांत आढळतात. त्यांना रंग शैवालामुळे मिळतो. याच कारणामुळे प्रवाळभित्तिका समुद्र सफरींचे आकर्षण ठरतात. काही मृदू प्रवाळ कॅल्शिअम काबरेनेटचे आवरण तयार करत नाहीत. काही प्रवाळांचा आकार फुलासारखा असतो. त्यांच्या मध्यभागी मुख असते. मुखाच्या भोवताली पाकळय़ांप्रमाणे दिसणारे तंतू असतात. या तंतूंना शुंडके म्हणतात. या तंतूंमध्ये डंख मारणाऱ्या विषारी दंशपेशी असतात. या शुंडकांचा आणि दंश पेशींचा वापर संरक्षणासाठी आणि भक्ष्य पकडण्यासाठी केला जातो.




दीपलक्ष्मी नारायण पुजारी, मराठी विज्ञान परिषद