जगभर उष्णकटिबंधात खारफुटी वने पसरली आहेत. मोजदाद करायला गेल्यास त्यांचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख ४० हजार चौरस किलोमीटर भरेल. ही वने १२३ देशांत पसरलेली असून ७५ टक्के वने फक्त १५ देशांत आढळतात. विषुववृत्ताच्या दक्षिणेला व उत्तरेला २५ अक्षांशात ही वने आहेत.जगभरातील कांदळवनांपैकी सर्वाधिक खारफुटी वने आशिया खंडात असून त्यांचे प्रमाण सुमारे ४२ टक्के आहे. उर्वरित वनांची विभागणी २१ टक्के आफ्रिका, १५ टक्के उत्तर आणि मध्य अमेरिका, १२ टक्के ऑस्ट्रेलिया आणि ११ टक्के दक्षिण अमेरिका या खंडांत झालेली आहे. इंडोनेशिया आणि ब्राझीलनंतर ऑस्ट्रेलियात कांदळवनांचे क्षेत्र मोठे आहे. आशिया खंडातील खारफुटी वनक्षेत्रापैकी सुमारे ४५.८ टक्के क्षेत्र भारतात आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडातील सुमारे नऊ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र आणि पूर्वोत्तर ब्राझीलमधील बाहियातील एकवीसशे चौरस किलोमीटर क्षेत्र श्वेत-श्याम खारफुटीसाठी प्रसिद्ध आहे. गल्फ ऑफ पनामा हे पनामा-कोलंबिया भागात असून तिथे दोन हजार ३३० चौरस किलोमीटर खारफुटीचे क्षेत्र आहे. ग्वाटेमालाजवळ बेलिझन कोस्ट मॅनग्रोव क्षेत्र असून ते दोन हजार ८५० चौरस किलोमीटर पसरले आहे. वेस्ट इंडीजच्या क्युबाजवळ ग्रेटर अॅट्टिलीस मॅन्ग्रोव्ह तीन हजार ५४० चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरले आहे. दहाव्या क्रमांकावरील खारफुटी वन एक्वेडोरच्या पॅसिफिक कोस्ट भागात असून त्याचे क्षेत्रफळ एक हजार चौरस किलोमीटर आहे आणि ते मुसाइन नदीच्या किनारी आहे. तिथे एव्हिसिनीया आणि हायझोफोरा या खारफुटी झाडांची वने आहेत.




क्षेत्रफळाच्या दृष्टीने १० सर्वात मोठय़ा कांदळवनांपैकी तीन भारतात आहेत. गोदावरी- कृष्णा नदीच्या त्रिभूज प्रदेशातील खारफुटी वनक्षेत्र सुमारे १९५ चौरस किलोमीटर असून इथे श्याम खारफुटी ब्रुगेरा आढळते. त्यानंतर अरबी समुद्रातील सिंधू नदीच्या त्रिभूज प्रदेशात इंडस डेल्टा अरेबियन सी वनक्षेत्र आहे. त्याचे क्षेत्रफळ बावीसशे चौरस किलोमीटर असून सिंधू नदीच्या पाण्यातून मोठय़ा प्रमाणात कीटकनाशके येत असल्याने त्या भागातील जैवविविधता धोक्यात आली आहे.
या शिवाय जगभर आणखी १० ठिकाणी छोटी खारफुटी वने आहेत. ही सारी वने वातावरणातील कार्बनची कोठारे असतात. ही वने पर्जन्यवनांपेक्षा चार पट कार्बन साठवतात व वातावरणातील कार्बनचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात.
-दीपिका कुलकर्णी