जीवन आणि मानवी कल्याणास समर्थन देणारे सागरी क्षेत्र हा पृथ्वीच्या प्रणालीचा सर्वात मोठा घटक मानला जातो. तथापि, २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या जागतिक महासागर मूल्यांकनात समुद्र परिसंस्थांची बरीच हानी झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे सागरी प्रणालींपासून होणारे फायदे कमी होत आहेत. याव्यतिरिक्त, २०५० पर्यंत मानवी लोकसंख्या नऊ अब्जांच्या आसपास पोहोचेल, असा अंदाज आहे. असे झाल्यास महासागरावरील ताणतणाव वाढतील.

महासागराच्या ढासळत्या परिस्थितीचे चक्र पूर्ववत करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी १ जानेवारी २०२१ रोजी संयुक्त राष्ट्रांनी २०२१-३० हे दशक ‘महासागर विज्ञान दशक’ म्हणून घोषित केले. महासागराचा शाश्वत विकास होण्यासाठी ‘महासागर विज्ञान’ विविध देशांना सुधारित प्रणाली पुरवणार आहे. जगभरात एकाच शाश्वततेच्या विचाराने काम केल्यास महासागरासंदर्भात काम करणारे सर्व शास्त्रज्ञ, शासन, शैक्षणिक धोरणकर्ते, व्यवसाय, उद्योग आणि नागरी समाज असे अनेक भागधारक या दशकात नवीन कल्पना, उपाय, भागीदारी आणि अनुप्रयोग करतील. शाश्वत विकासाच्या ध्येयांपैकी चौदावे ध्येय ‘पाण्याखालील जीवन’ हे आहे. युनेस्कोचा ‘आंतरशासकीय समुद्रशास्त्रीय आयोग’ या दशकाच्या प्रक्रियांचा समन्वयक आहे. ‘आपल्या भविष्यासाठी, आपल्याला आवश्यक असलेला महासागर’, हे आताचे घोषवाक्य आहे.

विज्ञानाच्या साहाय्याने समाज आणि महासागर जोडला जाईल. या ध्येयाने पुढील सात योजना राबवण्यात येतील. १) स्वच्छ महासागर : प्रदूषणाचे स्रोत ओळखून ते कमी किंवा बंद केले जातील. २) निरोगी आणि शाश्वत महासागर : सागरी परिसंस्था संरक्षित करून पुर्नसचयित केल्या जातील. ३) उत्पादक महासागर : शाश्वत अन्नपुरवठा आणि अर्थव्यवस्थेला आधार दिला जाईल. ४) समाजाला महासागराच्या परिस्थितीची कल्पना देऊन त्याच्या बदलत्या स्वरूपावर योग्य उपाययोजना केल्या जातील. ५) सुरक्षित महासागर : समुद्राशी संबंधित धोक्यांपासून जीवन आणि उपजीविका यांची साधने संरक्षित ठेवण्यात येतील. ६) महासागरासंबंधीची संशोधन विदा, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांमध्ये मुक्त देवाणघेवाण केली जाईल. ७) मानवकल्याण आणि शाश्वत विकासासाठी समाजाला महासागराची माहिती करून दिली जाईल. आपणही महासागर दशक मोहिमेत सहभागी होऊन सागराच्या सुरक्षितेस हातभार लावू या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बाळासाहेब कुलकर्णी/ मराठी विज्ञान परिषद