चौदाव्या शतकात लिथुआनिया आणि पोलंड यांनी रशियातील कीव्हियन साम्राज्यातील बेलारूसचा प्रदेश बळकावला. १७९५ साली रशियन झारने पोलंडवर आक्रमण करून बेलारूस परत मिळविले आणि ते रशियन साम्राज्यात सामील केले. या काळात रशियन झारीना म्हणजे सम्राज्ञी कॅथेरीन द्वितीयच्या रशियन साम्राज्याचा बेलारूस हा एक भाग होता. पुढे १९१७ सालच्या रशियन राज्यक्रांतीच्या काळात, त्या साम्राज्यातील बहुतेक राज्यांनी या क्रांतीत भाग घेऊन साम्राज्याचे सार्वभौमत्व झुगारले आणि स्वतंत्र देशाची घोषणा केली. बेलारूसनेही २८ मार्च १९१८ रोजी बेलारूसियन डेमोक्रॅटिक रिपब्लिक सरकारची घोषणा केली. एक वर्षभराने या प्रजासत्ताक राज्यपद्धतीत काही बदल करून बेलारूसच्या बोल्शेविक कम्युनिस्ट नेत्यांनी तिथे सोशॅलिस्ट सोव्हिएत रिपब्लिक स्थापन केल्याची घोषणा केली. १९२२ मध्ये बेलारूस, युक्रेन, रशिया वगैरे चार सोशॅलिस्ट प्रजासत्ताकांनी आपला सोव्हिएत युनियन हा राष्ट्रसंघ स्थापन केला. पुढे १५ देश या संघास जोडले जाऊन विशाल सोव्हिएत युनियन बनला.पहिले महायुद्ध संपताच १९१९ ते १९२१ दरम्यान झालेल्या पोलंड- सोव्हिएत युद्धात बेलारूसचा पश्चिमेकडील सुमारे एकतृतीयांश प्रदेश पोलंडने बळकावला. पुढे २० वर्षांनी, १९३९ मध्ये नाझी जर्मनी आणि सोव्हिएत युनियन यांनी पोलंडवर आक्रमण करून संपूर्ण पोलंडवर कब्जा केला. पोलंडमधील जर्मनी व रशियाच्या या सत्तास्पर्धेने दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. सोव्हिएत युनियनने पोलंडवर पूर्वेकडून चढाई करून पूर्व पोलंडचा मोठा प्रदेश घेतला, यामध्ये दोन दशकांपूर्वी पोलंडने बेलारूसचा घेतलेला आणि इतर काही पोलिश प्रदेश सोव्हिएत फौजांनी घेऊन प्रजासत्ताक बेलारूसमध्ये सामील केला. बेलारूसच्या पश्चिमेकडील प्रदेशात अनेक भिन्नवंशीय लोकांची वस्ती आहे, त्यापैकी बेलारूसियन, पोलिश, ज्यू आणि युक्रेनियन मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या प्रदेशात नेहमीच सामाजिक अशांतता, राजकीय अस्थैर्य असते. दुसऱ्या महायुद्धकाळात १९४१ मध्ये नाझी जर्मनीने सोव्हिएत प्रदेशांवर आक्रमण केले आणि पश्चिमेकडील मोठा सोव्हिएत प्रदेश ताब्यात घेतला. या आक्रमणानंतर १९४१ ते १९४४ ही चार वर्षे बेलारूस हा नाझी जर्मनीचा प्रदेश बनून राहिला.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com