चॅटजीपीटी निर्माण करणाऱ्या ओपन एआय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॅम्युअल हॅरिस ऑल्टमन यांचा जन्म २२ एप्रिल १९८५ रोजी अमेरिकेतील शिकागो येथे झाला. ते एक अमेरिकन उद्योजक आणि गुंतवणूकदार आहेत.

सॅम ऑल्टमन यांनी त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षीच अ‍ॅपल मॅकिंटॉश हा पहिला संगणक हाताळला. स्टॅनफर्ड विद्यापीठात दोन वर्षे संगणकशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर २००५ मध्ये पदवी न मिळवताच त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला.  सॅम ऑल्टमन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व ओळखले. त्याची क्षमता वापरून घेण्यासाठी त्यांनी नवनवीन उद्योग सुरू केले. त्यासाठी लागणारे भांडवलही उभारले. त्यांना बाजारपेठेतून पाठबळ मिळाले. यासोबत सॅमना स्वत:ला संगणकीय ज्ञान अवगत असल्याने डोक्यातील निरनिराळय़ा संकल्पनांना चालना देऊन कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवीन तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी अनेक स्टार्टअप्सना निधी दिला.  ऑल्टमन यांची तुलना स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्यासारख्या तंत्रज्ञानातील दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींबरोबर केली जाते.

ओपन एआय ही अमेरिकेतील एक संशोधन संस्था असून, तिची स्थापना डिसेंबर २०१५ मध्ये झाली. या संस्थेचा उद्देश सुरक्षित आणि फायदेशीर व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणे असा आहे. सध्या लोकप्रिय असलेला चॅटजीपीटी हा ओपन एआयद्वारे विकसित केलेला चॅटबॉट आहे. हा चॅटबॉट वापरकर्त्यांना इच्छित लांबी, स्वरूप, शैली व पातळीच्या दिशेने संभाषणाचा तपशील आणि भाषा वापरण्यास सक्षम करतो. डॉल ई हे ओपन एआयद्वारे विकसित केलेले मशीन लर्निग प्रारूप आहे. ते भाषेतून वर्णन केल्यावर त्याच्याशी जुळणारी प्रतिमा तयार करते. याला टेक्स्ट टू इमेज मॉडेल म्हणतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सॅम ऑल्टमन यांनी टूल्स फॉर ह्युमॅनिटी या कंपनीची सहस्थापना केली. ही कंपनी  व्यक्तित्वाचा पुरावा पडताळण्यासाठी म्हणजे प्रमाणित करण्यासाठी, डोळे स्कॅन करण्याकरिता डिझाइन केलेली प्रणाली तयार करते. वॉटरलू विद्यापीठाकडून २०१७ साली सॅम ऑल्टमन यांना अभियांत्रिकीची मानद डॉक्टरेट मिळाली. २०२३ मध्ये त्यांना, ‘टाइम’ मासिकाने जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आणि त्या वर्षांचा सीईओ, तसेच ‘बिझनेस वीक’ने तंत्रज्ञानातील सर्वोत्तम तरुण उद्योजकांपैकी एक म्हणून घोषित केले आहे. सॅम ऑल्टमन  यांना विश्वास आहे की जे जे काही मानव करू शकतो, ते सर्व व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकेल.