कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापलेल्या भविष्यात माणसाचे स्थान काय असेल हा आपल्या सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपले महत्त्व आणि कदाचित, अस्तित्व टिकून राहील का, हा कळीचा प्रश्न ठरत आहे.

या संदर्भात मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील अंतर समजून घेणे आवश्यक आहे. आपण करू शकत असलेली शारीरिक कष्टांची अनेक कामे आणि वैचारिक कामेही कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त प्रणाली आता सहजपणे आणि अधिक सफाईने करू शकतात. त्यांची प्रगती अधिक व्यापक प्रमाणात होईल यात शंका नाही. त्यामुळे या प्रणाली शिक्षक, डॉक्टर, लेखक, वकील अशा विविध वैचारिक व कौशल्याधारित पेशांतील व्यक्तींच्या कामाचा मोठा भाग उच्च दर्जासह पार पाडू शकतील आणि या क्षेत्रात मानवाचे स्थान घेऊ शकतील. अशा पर्यायी प्रणाली आता उपलब्ध होऊ लागल्या आहेत. तर मग असे काय राहिले की जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रवेश करू शकत नाही?

हेही वाचा >>> कुतूहल : कला क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता

याबाबतीत असा एक दृष्टिकोन आहे की आपण आपल्या बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात कमी लेखतो. साध्या आरशात दिसणारे आपले चित्र आपल्या शरीराची प्रत किंवा नक्कल नसते. ते फक्त आभासी प्रतिबिंब असते. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या सध्याच्या प्रणाली विचार किंवा भावना निर्माण करू शकत नाहीत, आरशाप्रमाणे केवळ नवीन प्रकारचे प्रतिबिंब तयार करतात असे म्हणता येईल. त्यांच्याकडे काही विशेष उल्लेखनीय क्षमता असू शकतात, पण त्या माणसासारख्या वर्तन किंवा गुणांच्या बहुरंगी छटांनी भरलेल्या नसतात.

कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाचा ऱ्हास घडवू शकते. जागतिकीकरण, व्यावहारिक जटिलता आणि तांत्रिक अंकीय उपकरणांच्या अधीन होण्यामुळे आपले त्यांवरील अवलंबन पराकोटीला जाणे हे त्याचे मुख्य कारण होऊ शकते. तरी अशा अतिप्रगत यांत्रिक प्रणालींनी मानवी मूल्यांचा पाया नष्ट करण्यापूर्वी त्यांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त प्रणालींची क्षमता लक्षणीय आहे हे मान्य करताना त्या मानवसमान नाहीत याचा विसर पडू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरज आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराच्या सखोल व संतुलित मूल्यमापनाची. अभ्यास असे दाखवतात की बऱ्याचदा तिची लंगडी बाजू आणि अपयशाच्या गोष्टी तिचे निर्माते त्यांच्या स्वार्थापोटी पुढे आणत नाहीत. आपण आपल्या विचारांची मर्यादा लक्षात घेऊन अपयश मिळणे मान्य करतो – ते आपले एक बलस्थानच असून आपल्या प्रगतीला कारणीभूत राहिलेले आहे. तरी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली स्वत:च्या मर्यादा किंवा अपयश येत आहे हे सांगू शकेल अशी संरचना आणि त्या परिस्थितीसाठी पर्यायी व्यवस्था करणे हा एक मार्ग असू शकेल.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल: office@mavipa.org  

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org