नेपाळमध्ये २५ एप्रिल २०१५ रोजी, सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर श्रेणीवर ७.८ इतकी प्रचंड होती. भूकंपाची नाभी (फोकस) काठमांडूच्या वायव्येला ८५ किमी अंतरावरच्या गोरखा जिल्ह्यातल्या बारपाक गावापाशी, भूपृष्ठाखाली ८.२ किमी इतकी खोल होती. भूकंपाची तीव्रता एवढी होती की त्याचा परिणाम संपूर्ण नेपाळमध्ये तर दिसून आलाच, पण भारत, चीन आणि बांगलादेश या शेजारच्या देशांमध्येही दिसला. या चार देशांत मिळून एकूण आठ हजार ९६२ लोक मृत्युमुखी पडले आणि २१ हजार ९५२ जण जखमी झाले.

हा भूकंप भरदिवसा झाल्यामुळे लोक कामासाठी घराबाहेर पडले होते, त्यामुळे बचावासाठी थोडीफार तरी धावपळ करू शकले. तरीसुद्धा जीवितहानीचा आकडा नऊ हजारांच्या घरात होता. भरीस भर म्हणून घरांची पडझड झाल्याने गावेच्या गावे जमीनदोस्त झाली. त्यामुळे लक्षावधी लोक बेघर झाले. त्यातच एव्हरेस्ट पर्वत तीन सेंमी र्नैऋत्येला सरकला. त्यामुळे जे हिमस्खलन झाले, त्यात २२ जणांचा मृत्यू झाला. उत्तर नेपाळमध्ये लामटांग नदीच्या खोऱ्यात हिमस्खलन होऊन २५० जण बेपत्ता झाले. भूकंपाच्या हादऱ्यांनी ठिकठिकाणी साचलेला बर्फ अस्थिर होऊन खाली घसरल्याने आणखीही काही ठिकाणी हिमस्खलन झाले. डोंगराळ भागात भूकंपानंतरही एकापाठोपाठ एक भूस्खलने होऊन अस्थिर झालेल्या दरडी काही काळ कोसळत राहिल्या. युनेस्कोने ताब्यात घेतलेल्या काठमांडू येथील पुरातन वारसास्थळांचीसुद्धा खूपच वाताहत झाली.

मोठा भूकंप झाल्यानंतर जे अनुगामी छोटे धक्के (आफ्टरशॉक्स) बसतात, ते तर दिवसभर जाणवतच होते; पण परत दुसऱ्या दिवशी, म्हणजे २६ एप्रिलला सकाळी ७ वाजून ८ मिनिटांनी ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. पुन्हा १२ मेला ७.३ तीव्रतेचा भूकंप झाला. त्याची नाभी काठमांडू आणि एव्हरेस्ट पर्वत यांच्यामधल्या चीनच्या सीमारेषेच्या नजीक, भूपृष्ठाखाली १८.५ किलोमीटर खोल होती. याही भूकंपामुळे २०० लोक मृत्युमुखी पडले, २५०० जण जखमी झाले आणि अनेक जण बेघर झाले.

साडेचार ते पावणेपाच कोटी वर्षांपूर्वी, भारतीय भूपट्ट उत्तरेकडे सरकत सरकत युरेशियन भूपट्टाला जाऊन भिडला आणि हिमालय पर्वत निर्माण झाला, या भूवैज्ञानिक घटनेत या भूकंपाचे आणि त्याचप्रमाणे हिमालयाच्या पट्ट्यात होणाऱ्या सर्वच भूकंपांचे मूळ आहे. भारतीय भूपट्ट अद्यापि दरवर्षी ५ सेंमी इतक्या मंदगतीने युरेशियन भूपट्टाकडे सरकत आहे. दोन सक्रिय भूपट्टांच्या सीमेवर हिमालयाच्या पर्वतरांगा उभ्या असल्याने त्या पूर्णपणे अस्थिर आणि म्हणूनच भूकंपप्रवण आहेत. नेपाळही या अस्थिर पट्ट्यात येणारा देश असल्याने भूकंपप्रवण आहे.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org