अलीकडेच आपल्या संरक्षण दलाशी निगडित संशोधन संस्थेच्या संचालकपदी असणाऱ्या एका वरिष्ठ वैज्ञानिकाकडून काही संवेदनशील माहिती शत्रूला देण्यात आल्याचे उघडकीस आले. त्याला मातृभूमीशी गद्दारी करायला लावण्यास ‘हनी ट्रॅप’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रणालीचा वापर केला गेला असल्याचेही उघडकीस आले. आजवर या प्रणालीचा वापर सर्वसामान्य व्यक्तींवर करून, त्यांची छायाचित्रे मिळवून, बदनाम करण्याची धमकी देत खंडणी उकळली जात होती. पण आता त्याच प्रणालीचा वापर कळीची माहिती मिळवण्यासाठी शत्रूकडून होत असल्याचे पाहून सैन्यदल खडबडून जागे झाले आहे. आपले सैनिक तसेच अधिकारी या हनी ट्रॅपला बळी पडून त्यांचे ‘सूर्याजी पिसाळा’त परिवर्तन होण्याची काय शक्यता आहे, हे अजमावता आल्यास त्या परिस्थितीला लगाम घालणे शक्य होईल, या विचाराने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका आविष्काराला मदतीला घेतले जात आहे.

त्यासाठी त्यांनी एक खास चॅटबॉट विकसित केला आहे. तो तयार करण्यासाठी टेरिटोरियल आर्मी या नागरी संघटनेतील संगणक अभियंत्यांना साकडे घातले गेले होते. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आज्ञावलीचा समावेश असलेली ही यंत्रणा विकसित केली आहे. ती संशयित व्यक्तीला संदेश पाठवून त्याच्याशी संवाद स्थापित करते.

सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्याकडे हा चॅटबॉट सोपवला जातो. आपल्या तुकडीतील संभाव्य फितुरांना चॅटबॉटद्वारे संदेश पाठवला जातो. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांचा वापर केला जातो. जणू एखाद्या तरुणीनेच तो पाठवला आहे असा आभास निर्माण केला जातो. त्या प्रेमाच्या संदेशाला ती व्यक्ती कसा प्रतिसाद देते, हे अजमावले जाते. जर त्याने त्यातला धोका ओळखून तो संवाद संपवून टाकणारे पाऊल उचलले, तर तो गद्दारी करण्याची शक्यता नसल्याचा पुरावा मिळेल. पण जर त्याने त्या प्रेमळ संदेशाला अनुकूल प्रतिसाद दिला तर त्याच्यावर कडक नजर ठेवून, त्याची त्या जागेहून वेळीच उचलबांगडी करून, त्याच्या हाती कोणतीही गुप्त माहिती लागणार नाही, याची तजवीज करणे शक्य होईल. चॅटबॉटच्या संदेशाचे स्वरूप निरनिराळय़ा परिस्थितीनुरूप बदलते ठेवण्याची सोयही केली गेली असल्यामुळे वेगवेगळय़ा वातावरणातल्या सैन्यतुकडय़ांना ती प्रणाली वापरता येईल. फितुरीची शक्यता टाळण्याचा हा उपाय कृत्रिम बुद्धिमत्तेचीच देणगी आहे, असे सैन्यातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. बाळ फोंडके,मराठी विज्ञान परिषद