मार्टन एल. लॅडिस्लस यांचा जन्म १५ ऑगस्ट १९०१ रोजी झाला. मार्टन हे भौतिकशास्त्रज्ञ होते, इलेक्ट्रॉन भौतिकशास्त्र आणि विशेषकरून इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉन इंटर्फरन्सेस या क्षेत्रात त्यांनी संशोधन केले. १९२८ ते १९३८ या काळात मार्टन हे बेल्जियम येथील ब्रुसेल्स युनिव्हर्सिटीचे सदस्य होते.

१९३८ ला ते अमेरिकेत आले आणि त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. १९३८-१९४१ मध्ये आरसीए उत्पादन करणाऱ्या कंपनीत ते रुजू झाले. १९४१ -१९४६ दरम्यान स्टानफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रॉन ऑप्टिक्स विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९४६ -१९७० या काळात त्यांनी वॉशिंग्टन येथील राष्ट्रीय मानांकन संस्थेत (नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स, वॉशिंग्टन) मध्ये भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम केले.

मार्टन यांच्या नावावर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉन इंटर्फरन्सेस या क्षेत्रातील पेटंट आहेत. ४ एप्रिल १९३४ रोजी क्रोमोबॅक्टेरियम प्रोडीजिओसम या जीवाणूचे पहिले छायाचित्र घेण्याचा मान मार्टन यांना दिला जातो. ८ मे १९३४ रोजी त्यांनी बेल्जियन अकॅडमीसमोर आपला पहिला फोटोमायक्रोग्राफ सादर केला. मोठ्या प्रयासाने १६ जून १९३४ रोजी ‘नेचर’ या संशोधन पत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले. काही दिवसांतच ते आपल्या पत्नीबरोबर बर्लिनला गेले असताना त्यांनी नॉल, रस्का आणि ब्रुच या तीन शास्त्रज्ञांची भेट घेतली. त्यांनी आपले छायाचित्र जेव्हा त्यांना दाखवले तेव्हा त्यांच्या तोंडून उद्गार निघाले ‘हे शक्यच नाही!’ पण ते शक्य झाले होते.

काही वर्षांतच स्ट्युअर्ट म्युड आणि त्याच्या सहकाऱ्यांना विस्तृत आकाराची छायाचित्रे मिळवण्यात यश प्राप्त झाले. १९३९ साली जी. ए. कौस्चे, इ. फान्कुच आणि हेल्म्युट रस्का यांनी टोबॅको मोसाईक व्हायरसचे दंडगोलाकार छायाचित्र प्रकाशित केले. याच त्रिकुटाने पुढे बॅक्टेरियाच्या पेशीत वाढणारा व्हायरस, बॅक्टेरियोफाज, हा शुक्रजंतूंसारखा दिसतो हे छायाचित्राद्वारे दाखवून दिले. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली घेतलेल्या छायाचित्रांना शास्त्रीय परिभाषेत ‘फोटोमायक्रोग्राफ’ असे संबोधले जाते. बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या पेशींची आंतररचना विस्तृतपणे समजून घेणे ‘फोटोमायक्रोग्राफ’च्या सहाय्याने शक्य झाले.

१९३०-१९५० मध्ये मार्टन यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा सखोल आराखडा तयार केला. सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्रगतीतील हे महत्त्वपूर्ण वळण मानले जाते. मार्टन हे स्मिथसोनियन संस्थेमध्ये १९७०-१९७९ या काळात संशोधन सहकारी होते. २० जानेवारी १९७९ रोजी मार्टन यांचा मृत्यू झाला.

डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org