अतिप्राचीन सजीवांचे अवशेष खडकांच्या थरांमध्ये मिळतात. त्या अवशेषांना आपण जीवाश्म म्हणतो. जीवाश्मांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. भूवैज्ञानिकांना खडकांमधे प्राचीन पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरातली सुटी हाडे, सांगाडे आणि दात सापडतात किंवा अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीरावरची कवचे सापडतात. अशा अवशेषांना कायिक जीवाश्म (बॉडी फॉसिल्स) म्हणतात. पण प्राण्यांच्या पावलांचे ठसे, त्यांनी बनवलेली बिळे, सागराच्या तळालगत सरपटत जाणाऱ्या प्राण्यांच्या सरकत जाण्यामुळे पडलेल्या चाकोऱ्या (ट्रेल्स), अशा प्राण्यांनी केलेल्या हालचालींचे अवशेष खडकांत आढळतात. या प्रकारच्या जीवाश्मांना लेशजीवावशेष (ट्रेस फॉसिल्स) किंवा पदचिन्ह जीवावाशेष (इक्नोफॉसिल्स) म्हणतात.

जीवाश्मांमध्ये सजीवांच्या शरीरातल्या मृदू ऊतींचे (सॉफ्ट टिश्यूज) जतन होणे अत्यंत दुरापास्त असते. कारण मृत्यूनंतर मृदू ऊती सडून जातात आणि नाश पावतात. पण निसर्गामध्ये अनेक विस्मयकारक गोष्टी घडू शकतात. त्यातली एक आपल्याला अति-उत्तरेकडे असणाऱ्या टुंड्रा प्रदेशात पाहायला मिळते. या भागात तापमान शून्याच्या खालीच असते. उन्हाळ्यात क्वचित् कधी तरी ते शून्यापेक्षा थोडेसे जास्त असते. इथली जमीन सदैव गोठलेली असते. त्यामुळे तिला ‘चिर-अतिशीत भूमी’ (पर्माफ्रॉस्ट) असेच म्हटले जाते.

सुमारे गेल्या तीस लाख वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर हिमयुग सुरू होते. तापमानात थोडा चढ-उतार होत असला, तरी तापमान कमालीचे थंड होते. त्यामुळे पृथ्वीवर फार मोठ्या क्षेत्रावर बर्फ साठला होता. उत्तर ध्रुवाभोवतीच्या आर्क्टिक महासागरातले पाणीदेखील गोठले होते. गेल्या आठ ते दहा हजार वर्षांपूर्वी हे हिमयुग संपले. त्या हिमयुगात हत्तीचा पूर्वज असणारा एक प्राणी होता. आपण त्याला केसाळ मॅमथ (वूली मॅमथ) या नावाने ओळखतो. बराचसा हत्तीसारखा दिसत असला, तरी त्याचे कान आणि शेपूट लहान होते आणि अंगावर भरपूर लोकर होती. त्या लोकरीमुळे मॅमथचा थंडीपासून बचाव होत असे. सगळ्यात नवलाची गोष्ट अशी की, हे प्राणी अतिशीत प्रदेशात राहत असत. त्यामुळे त्यांचे मृतदेह जेव्हा मृत्यूनंतर लगेच तिथल्या मृदेच्या खाली (सॉइल) गाडले गेले, तेव्हा त्यांच्या देहाचे फारसे विघटन झाले नाही. त्यामुळे मॅमथचे जे जीवाश्म सापडतात, त्यात सांगाड्याबरोबर त्यांचे रक्त, मांस, चामडे यांचेही जतन झाल्याचे आढळून येते. आफ्रिकेत आढळणाऱ्या हत्तींच्या लोक्जोडोन्टा या प्रजातीपेक्षा आशियातल्या एलेफस या प्रजातीशी मॅमथचे जास्त जवळिकीचे नाते आहे.

सायबेरियात हत्तींप्रमाणे इतरही काही सस्तन प्राण्यांचे जीवाश्म मृदू ऊतींसह सापडले आहेत.

– डॉ. नंदिनी विनय देशमुख मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org