जॉर्ज ऑटो गे यांनी १९२१ साली पीटसबर्ग विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि ते व त्यांची पत्नी मार्गारेट हे जॉन हॉपकिन्स विद्यापीठात प्राणिशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून रुजू झाले. त्या काळात पेशींचा, ऊती संवर्धनाचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याची सोय विद्यापीठांमध्ये नव्हती. ध्येयाने झपाटलेले तरुण जॉर्ज सतत ऊती संवर्धनाचा विचार करत होते. हॉपकिन्स प्रयोगशाळेत ऊती संवर्धनावर त्यांनी संशोधन सुरू केले.
जॉर्जना पेशी विभाजनाचे चलच्चित्र कॅमेरात कैद करायचे होते व त्यानुसार कर्करोगावर उपाय शोधून काढायचा होता. फेब्रुवारी १९५१ मध्ये हेन्रिएटा लाक्स नावाची ३१ वर्षीय आफ्रिकन-अमेरिकन महिला बल्टिमोर, मेरिलँड येथील हॉपकिन्स रुग्णालयात दाखल झाली. जॉर्ज गे, मार्गारेट गे आणि मेरी क्युसीबेक यांनी तिच्या गर्भाशयाची तपासणी केली. तिच्या शरीरात सर्व्हायकल कॅन्सरचा अर्बुद (ट्यूमर) वाढत होता. हेन्रिएटा लाक्स हिचा कर्करोगाने मृत्यू झाला. जॉर्ज गे यांनी तिच्या कर्करोग पेशींचा नमुना तपासला असता, त्यांना त्या पेशींचे वागणे चमत्कारिक आढळले.
सामान्य मानवी पेशी ४०-६० वेळा विभाजित झाल्यानंतर मरतात, पण हेन्रिएटा लाक्सच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी सतत विभाजित होत होत्या. म्हणजेच या पेशी दीर्घकाळ जिवंत राहणाऱ्या होत्या. १९५२ साली याच पेशी पुढे कर्करोग संशोधनासाठी ‘HeLa’ पेशी म्हणून प्रसिद्ध झाल्या. आजही हेन्रिएटा लाक्सच्या शरीरातील या पेशी जगभरात सगळीकडे प्रयोगासाठी वापरल्या जात आहेत. या पेशींच्या पापुद्र्याला ‘हेला सेल लाइन’ असे संबोधले जाते. या पेशींचे महत्त्व असे की, जोपर्यंत मूळ पेशी जिवंत आहे, तोपर्यंत या पेशीपापुद्र्यातील कुठलीच पेशी मरत नाही; म्हणून या पेशींना ‘अमर पेशी’ असेही म्हणतात.
‘HeLa’ पेशींच्या शोधामुळे आरोग्य क्षेत्रात रोग तपासणीस एक वेगळे वळण मिळाले. पोलिओची लस तयार करण्यासाठी डॉ. जॉन साक यांनी तसेच जनुकांचा आराखडा ठरवताना ‘हेला ऊती संवर्धन तंत्राचा’ जगभर वापर केला जातो. जॉर्ज यांनी या सामान्य निरोगी पेशीचे रूपांतर कर्करोगाच्या पेशीमध्ये कसे होते हे तपासले आणि जगभरातील हजारो संशोधकांना कर्करोग संशोधनासाठी प्रशिक्षित केले. जॉर्ज यांचे हे खूप मोठे योगदान आहे. जॉर्ज गे टिशू कल्चर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी लेक प्लासिड, न्यूयॉर्क येथे डब्ल्यू अल्टॉन जॉन्स सेल सेंटर उभारले.
जॉर्ज १९७० मध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाने मरण पावले. मरणापूर्वी शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरना वारंवार स्वत:च्या पेशींचा नमुना भविष्यात संशोधनासाठी वापरण्यासाठी ते विनंती करत होते.
डॉ. रंजन गर्गे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
