व्हायरस म्हणजेच विषाणू, हे अतिसूक्ष्म कण आहेत. मानले तर सजीव, नाहीतर निर्जीव! विषाणू इतके सूक्ष्म असतात की ते सामान्य सूक्ष्मदर्शकातून दिसत नाहीत, तर त्यांना पाहण्यासाठी अतिशय आधुनिक अशा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता असते. विषाणू अतिसूक्ष्म असल्याने त्यांचा आकार नॅनोमीटरमध्ये मोजला जातो. तांदळाच्या १ मिलिमीटर जाडीच्या दाण्यावर सुमारे १०० नॅनोमीटर आकाराचे १०,००० विषाणू सहज बसू शकतात!

सन १८९२ मध्ये डिमिट्री इवानोस्की या रशियन शास्त्रज्ञाने टोबॅको मोझेक विषाणूचा शोध लावला. हा मानवाला माहीत झालेला जगातील पहिला विषाणू! परंतु त्या काळात विषाणू पाहणे शक्य नव्हते. पुढे १९३०च्या दशकात इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या शोधामुळे, या अदृश्य विषाणूंचे खरे स्वरूप प्रथमच पाहिले गेले.

विषाणू सजीव आहेत की निर्जीव? हा प्रश्न विज्ञानात दीर्घकाळ चर्चेचा विषय राहिला आहे. विषाणूला पेशीय रचना नसते, त्यामुळे स्वत:ची चयापचय व्यवस्था नसते. ते अन्न घेत नाहीत, ऊर्जा निर्माण करत नाहीत, स्वत:हून वाढत नाहीत आणि पुनरुत्पादनही करत नाहीत; म्हणून त्यांना निर्जीव मानले जाते. पण संक्रमणाद्वारे ज्यावेळी ते सजीवपेशीत प्रवेश करतात, तेव्हा ते त्या पेशीच्या यंत्रणेचा ताबा घेतात. त्यांच्यातील ‘डीएनए’ किंवा ‘आरएनए’सारख्या आनुवंशिक पदार्थाच्या साहाय्याने पेशीत स्वत:च्या अनेक प्रतिकृती निर्माण करून पेशीतून बाहेर येतात. हे विषाणू इतर पेशींना संक्रमित करतात. अशा स्थितीत ते सजीवांसारखे वागतात. त्यामुळे त्यांना ‘सीमारेषेवरचे जीव’ असेही म्हटले जाते.

विषाणू केवळ आनुवंशिक पदार्थ डीएनए किंवा आरएनए आणि प्रथिनांच्या कवचाने बनलेले असतात. या प्रथिनाच्या कवचाच्याबाहेर काही विषाणूंमध्ये चरबीपासून बनलेलं एक बाह्यआवरण देखील असते, जे त्यांना पेशीत प्रवेश करताना मदत करते. काही विषाणू दिसायला अगदी गोलसर, करोना व्हायरससारखे, काहींचा आकार लांबट आणि दंडगोल (उदाहरणार्थ टोबॅको मोझेक व्हायरस), तर काही इतके जटिल असतात की, त्यांचे रूप एखाद्या अवकाशयानसारखे वाटावे!

विषाणू मानवांमध्ये विविध प्रकारचे आजार निर्माण करतात. करोना व्हायरसमुळे होणारा कोविड-१९ आणि एचआयव्हीमुळे होणारा एड्स ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. वनस्पतींमध्येही विषाणूंचे संक्रमण होते. विषाणू फक्त हानीकारकच असतात असे नाही. ते निसर्गात महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, बॅक्टेरियॉफाज प्रकारचे विषाणू निसर्गातील बॅक्टेरिया नियंत्रित करून पर्यावरणाचे संतुलन राखतात. जैववैज्ञानिक संशोधनात आणि जीनथेरपीसारख्या आधुनिक उपचारांमध्ये ते वाहक म्हणून फार उपयुक्त ठरतात.

डॉ. विनायक सुतार मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org