मानवाने संगणकाचा शोध लावला तेव्हा तो केवळ अत्यंत जलद आकडेमोड करणारा इलेक्ट्रॉनिक गणक होता. तेव्हापासून आजपर्यंत त्यात अनेक बदल झाले, पण त्याची मूलभूत रचना जशी होती तशीच आजही आहे.

संगणकाचे पाच प्रमुख घटक असतात. इनपुट-आउटपुट युनिट्स, स्मृती युनिट, आकडेमोड आणि तार्किक युनिट, बॅकिंग स्टोअर युनिट आणि नियंत्रण युनिट. इनपुट युनिट माणसांना कळणाऱ्या माहितीचे, म्हणजे मुद्रित मजकूर, रेखाचित्रे किंवा आवाज इत्यादीचे संगणकास कळणाऱ्या बायनरी कोडमध्ये रूपांतर करतात. आउटपुट युनिट संगणकाने निर्माण केलेल्या बायनरी कोडचे माणसांना कळणाऱ्या माहितीत रूपांतर करतात. संगणकाचा कीबोर्ड, माउस, मायक्रोफोन, स्कॅनर ही इनपुट युनिट्सची, तर पिंट्रर, स्पीकर आणि संगणकाचा स्क्रीन ही आउटपुट युनिट्सची काही उदाहरणे.

generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

इनपुट युनिट्सद्वारा संगणकात दोन प्रकारची माहिती भरली जाते. आज्ञावली आणि विदा. आज्ञावलीत संगणकाला त्याने कोणत्या क्रिया करायच्या आहेत त्यासंबंधित संगणकाला कळतील अशा भाषेत आज्ञा दिलेल्या असतात, तर त्या आज्ञा ज्यावर कार्यान्वित करायच्या असतात त्याला विदा म्हणतात. उदाहरणार्थ, दोन संख्यांची बेरीज करायची असेल तर ‘बेरीज कर’ ही आज्ञा आणि त्या संख्या ही विदा.

नियंत्रण युनिटद्वारे या आज्ञावलीतील प्रत्येक आज्ञेला कार्यान्वित केले जाते. त्या आज्ञेनुसार इनपुट युनिटकडून माहिती घेणे किंवा आउटपुट युनिटकडे माहिती पाठवणे किंवा आकडेमोड करणे किंवा तार्किक गोष्ट करायची असल्यास ती आकडेमोड आणि तार्किक युनिटकडून करून घेणे हे नियंत्रण युनिटचे काम आहे.

संगणकाला त्याच्या स्मृतीमध्ये सर्व आज्ञावली ठेवण्याची आवश्यकता नसते; परंतु त्याच वेळी या सर्व आज्ञावली अशा प्रकारे संग्रहित केल्या जाणे आवश्यक असते, की त्या गरज पडल्यास वेगाने संगणकाच्या स्मृतीमध्ये हस्तांतरित केल्या जाऊ शकतील. हे काम बॅकिंग स्टोअर युनिट करते. हार्ड डिस्क, फ्लॅश ड्राइव्ह इत्यादीसारख्या अनेक प्रकारच्या बॅकिंग स्टोअर युनिट्स उपलब्ध आहेत.

थोडक्यात, संगणकाकडून काम करून घेण्यासाठी माणसाला त्याच्या आज्ञावलीत अत्यंत पद्धतशीरपणे आज्ञा लिहाव्या लागतात. संगणक त्या सर्व आज्ञा उत्तमपणे आणि त्वरित पार पाडतो. एखादी आज्ञा चुकली तर ती चुकीची आज्ञाही तो त्याच निष्ठेने पार पाडतो. अशा परिस्थितीत आलेले अनपेक्षित उत्तर पाहून मानवी प्रोग्रॅमरलाच त्याच्या आज्ञावलीत सुधारणा करावी लागते. अशा ‘हुशार सांगकाम्या’ असलेल्या संगणकाला कृत्रिम बुद्धिमत्ता माणसापेक्षा विद्वान कशी बनवते ते आपण पुढच्या लेखात बघू.     

मकरंद भोंसले ,मराठी विज्ञान परिषद