कच्छ आखातातील सागरी उद्यान; महात्मा गांधी सागरी राष्ट्रीय उद्यान, अंदमान; मन्नार सागरी उद्यान, तमिळनाडू; गहिरमाथा संरक्षित क्षेत्र, ओरिसा; मालवण सागरी संरक्षित क्षेत्र ही भारतातील सागरी उद्याने आणि संरक्षित प्रदेश आहेत. यातील सर्वात मोठे कच्छ आखातातील सागरी उद्यान द्वारका जिल्ह्यात गुजरात राज्यात आहे.

२७० चौरस किलोमीटर प्रदेशातील लहान मोठी ४२ बेटे आणि जामनगरपासून ओखापर्यंत हे उद्यान पसरलेले आहे. बेटाभोवती प्रवाळाने वेढलेले प्रदेश आहेत. यातील सर्वात प्रसिद्ध पिरोटन बेट जामनगरनजीक  इंडियन ऑइल वडीनार संकुलाजवळ आहे. या संकुलात काम करणारे अनेक कर्मचारी मार्गदशक प्रमाणपत्रधारक आहेत. उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांना जामनगर वन केंद्राकडून परवानगी घ्यावी लागते. सागरी उद्यानाच्या ११० चौरस किलोमीटरच्या गाभा क्षेत्राबाहेरील बेटावर व किनाऱ्यास भेट देण्याची परवानगी मिळते. पर्यटन शुल्क आहे. 

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्र वैज्ञानिक होण्यासाठी..

सागरी उद्यानात स्पंजच्या ७० जाती, प्रवाळांच्या ५२ जाती (दृढ आणि मृदू प्रवाळ) आणि ९० जातींचे सागरी पक्षी आहेत. ओहोटीच्या वेळी समुद्र गोगलगायी, जेलिफिश, समुद्र पुष्प उथळ पाण्यात दिसतात. संधीपाद, मृदुकाय, कंटकचर्मी संघातील बहुतेक सजीव येथे पाहता येतात. येथील पाण्यात पफर फिश, सी हॉर्स, स्टिंग रे, व्हेल शार्क आहेत. ग्रीन सी, ऑलिव्ह रीडले आणि लेदर बॅक ही दुर्मीळ कासवे, दोन सागरी सर्प आणि समुद्र गायी येथे पाणवनस्पतींच्या आश्रयाने राहतात.  

सागरी सस्तन प्राण्यांपैकी पररहित पॉरपॉईज, डॉल्फिन, बॉटल नोज डॉल्फिन, हंप बॅक डॉल्फिन आणि ब्लू व्हेल क्वचित दिसतात. अधिक खोल सागरी पाण्यात व्हेल शार्क अधूनमधून आढळतात. २० हजारांहून अधिक रोहित पक्षी चिखलात घरे बांधण्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी दरवर्षी येथे येतात. विविध सागरी पाणपक्ष्यांचे हे खाद्य मिळवण्याचे स्थान आहे.

याशिवाय गहिरमाथा ओरिसा हे सागरी कासवांच्या जलावतरणासाठी प्रसिद्ध ठिकाण, अंदमान प्रवाळ किनारे, राणी झाशी नॅशनल पार्क अंदमान हे फळभक्षी वटवाघळे व खाऱ्या पाण्यातील सुसरी आणि मन्नार गल्फ हे तमिळनाडूतील उद्यान सागरी वनस्पती आणि जैवविविधतेबाबत प्रसिद्ध आहे.  मालवणचे किनारे महाराष्ट्र किनाऱ्यावरील अमूल्य ठेवा आहेत. 

– डॉ. मोहन मद्वाण्णा

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org