पिण्यायोग्य पाण्यात अल्प प्रमाणात क्षार विरघळलेले असतात. असे पाणी (गोडे पाणी) पावसामुळे, नद्यांमधून आणि बर्फ वितळल्याने तयार होते. इतर गोडय़ा पाण्याच्या स्रोतांतही अल्प प्रमाणात क्षार विरघळलेले असतात. त्यांची चव आपल्या जिभेला जाणवत नसल्याने ते पाणी खारट लागत नाही. समुद्रातील पाणी मात्र खारट लागते. समुद्राच्या पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण ग्रॅम प्रति लिटर म्हणजे ‘पार्ट पर थाउजंड’मध्ये (पीपीटी) मोजण्याची पद्धत आहे. पीपीटी हे क्षारता मोजण्याचे एकक आहे. सागरी पाण्यातील एकूण क्षार ३५ ग्रॅम प्रति लिटर असतात. त्यात प्रामुख्याने सोडिअम क्लोराईड, मॅग्नेशिअम क्लोराईड, कॅल्शिअम, पोटॅशिअम यांची सल्फेट संयुगे, कॅल्शिअम काबरेनेट, यांचे  क्षार विरघळलेले असल्याने पाणी खारट होते. 

कमी अक्षांशांच्या ठिकाणचे सागर अधिक क्षारता तर जास्त अक्षांशाच्या पट्टय़ातील सागर कमी क्षारता दर्शवतात. सूर्यप्रकाशाची तीव्रता हे याचे थेट कारण आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्याची क्षारता ३६-३७ पीपीटी तर बंगालच्या उपसागराची क्षारता प्रमाण कमी असते, कारण सहा नद्या भारतातून आणि चार महानद्या म्यानमारमधून बंगालच्या उपसागरास मिळतात.

काही सरोवरे ‘सॉल्ट लेक्स’ म्हणून ओळखली जातात. बुलढाण्यातील लोणार सरोवर १०० पीपीटी क्षारतेच्या पाण्याचा आहे. हा जलाशय बंदिस्त असून त्यातील पाणी केवळ बाष्पीभवनानेच बाहेर पडते. पाण्याचे बाष्पीभवन होते तेव्हा विरघळलेले क्षार मागे राहतात. शिवाय नद्यानाल्यांचे पाणी कोणत्याही जलाशयात मिसळताना अधिकच क्षार त्यात सोडते. उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने क्षारता अधिकाधिक वाढते. वर्षांनुवर्षे या प्रक्रियेमुळे असे जलाशय खारट झाले. हीच प्रक्रिया समुद्राच्या बाबतीत अब्जावधी वर्षांपासून सुरू आहे आणि म्हणून समुद्र खारट झाले आहेत. महासागरांतील तळाच्या खडकातून झिरपलेल्या गरम पाण्यातून (हायड्रोथर्मल व्हेंट्स) आणि खोल पाण्यातील ज्वालामुखींच्या उद्रेकामुळेदेखील क्षार समुद्राच्या पाण्यात मिसळतात.

असे असले तरी महासागराची क्षारता प्रमाणाबाहेर वाढत नाही, कारण काही प्रमाणात समुद्रतळाशी खनिजे निर्माण होण्यासाठी तसेच जीवसृष्टीच्या आवश्यक जीवनप्रक्रियांसाठी समुद्रजलातील क्षार वापरले जातात. समुद्रजलातील नेमकी लेश मूलद्रव्ये (ट्रेस एलिमेंट्स) काही सागरी प्राणी टिपून घेतात. जसे व्हॅनॅडीअम समुद्रकाकडी हा कंटकीचर्मी, शेवंड आणि शिणाणे हे कोबाल्ट तर मृदुकाय निकेल टिपतात.

– डॉ. बाळासाहेब कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org