एखादा जैविक नमुना पारदर्शक जरी भासत असला तरी एका विशिष्ट प्रकाशतंत्राच्या साहाय्याने त्या जैविक नमुन्याची वेगळ्या पद्धतीने पाहणी केली जाते. एखाद्या पेशीत जी विविध पेशीअंगके (सेल ओरगॅनेल्स) असतात ती सूक्ष्म फरकाने विविध घनतेची आणि वेगवेगळ्या अपवर्तक सूचकांकाची (रिफ्राक्टिव्ह इंडेक्स) असतात. उदा. पेशीचे पारपटल, पेशीभित्तिका, केंद्रक, इत्यादी. परंतु ही विविधता संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकत नाही. एका विशिष्ट प्रकाशतंत्राच्या साहाय्याने प्रकाशकिरण वेगवेगळ्या अवस्थांमधून (फेजेस) नमुन्यांतून आरपार पाठवले जातात.

या तंत्रात एक फेज प्लेट आणि त्यात फेज रिंग वापरलेली असते. नमुन्याच्या आतील विविध घनतेमुळे आरपार जाणारे प्रकाशकिरण आपला प्रकाशमार्ग बदलतात. हा बदल त्यांच्या तरंगलांबीच्या १/४ (एकचतुर्थांश) इतका असतो. परिणामी प्रत्येक पेशीअंगक वेगवेगळ्या रंगछटा किंवा कृष्ण-धवल विरोधाभासात दिसते. त्यामुळे पेशीची रचना त्रिमिती स्वरूपात अभ्यासता येते. या तंत्रातून फ्लोरोसंट तसेच ब्राइट-फील्ड अशा प्रकारच्या त्रिमिती प्रतिमा मिळू शकतात. या तत्त्वावर आधारित सूक्ष्मदर्शकाला ‘फेज कॉन्ट्रास्ट सूक्ष्मदर्शक’ असे म्हणतात.

‘फेज कॉन्ट्रास्ट’ सूक्ष्मदर्शकाचे जनक फ्रीत्झ झेरनिक यांनी १९०५ मध्ये अॅमस्टरडॅम विद्यापीठात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित विषयात प्रवेश घेतला. १९०८ मध्ये ग्रोनीनगेन विद्यापीठातून गणित या विषयात त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले. याच विद्यापीठात त्यांनी ‘क्रिटिकल ऑपलेसन्स’ या विषयावर संशोधन केले. त्यासाठी १९१२ मध्ये त्यांना पुन्हा पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सन १९१३ मध्ये ग्रोनीनगेन विद्यापीठातील खगोलशास्त्राचे सुप्रसिद्ध प्राध्यापक कॅप्टेयन यांनी फ्रीत्सला साहाय्यक म्हणून आमंत्रित केले. भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ म्हणून ग्रोनीनगेन येथे त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांना वैद्याकशास्त्रात अॅमस्टरडॅम विद्यापीठाची डॉक्टरेट प्राप्त झाली.

१९३० पासून ते प्रकाशशास्त्राकडे वळले. यादरम्यान त्यांनी ‘फेज कॉन्ट्रास्ट’ आणि ‘सदोष आंतरगोल भिंगामुळे निर्माण होणाऱ्या चुकीच्या प्रतिमा’ यावर लेख लिहिला. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांनी ‘प्रकाशकिरणांचे विचलन करणारी सदोष भिंगे’ या समस्येचे निराकरण केले. त्यांनी ‘फेज कॉन्ट्रास्ट’ हा चित्तवेधक शोध १९३० साली त्यांच्या ब्लॅकपेंटेड ऑप्टिकल प्रयोगशाळेत लावला. जेना येथील जगप्रसिद्ध झेईस कारखान्याला ‘फेज कॉन्ट्रास्ट सूक्ष्मदर्शकाचे’ महत्त्व कळले नाही. ‘जर्मन वेरमाच’ या कंपनीने झेरनिक यांचे सर्व शोध घेतले आणि पहिले फेज कॉन्ट्रास्ट सूक्ष्मदर्शकयंत्र १९४१ साली तयार झाले. रॉयल सोसायटीने त्यांना रमफोर्ड मेडल देऊन सन्मानित केले. १९५३ साली भौतिकशास्त्राचा नोबेल देऊन त्यांना गौरवण्यात आले.

डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org