प्रयोगशाळेपासून प्रत्यक्ष वापरापर्यंत सूक्ष्मजैविक संशोधनाची प्रगती ही थक्क करणारी आहे. यालाच ‘लॅब टु फिल्ड’ असे म्हणतात. जैवतंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्रात काही महत्त्वाचे शोध केवळ प्रयोगशाळेतच न राहता प्रत्यक्ष शेती, आरोग्य आणि उद्याोगक्षेत्रात वापरले जात आहेत.
कृषी क्षेत्रात सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून होणारे नत्र स्थिरीकरण झाडाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हर्मन हेलरिगेल आणि हर्मन विलफर्थ यांनी १८८६ साली द्विदल वनस्पतींच्या मुळाशी निर्माण होणाऱ्या गाठींच्या माध्यमातून हवेतील नत्र वनस्पतीला उपलब्ध करून दिला जातो, याचा शोध लावला. नंतर १८८८ साली मार्टिनस बेजेरिंक या शास्त्रज्ञाने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंचा शोध लावला. हे प्रयोगशाळेतील संशोधन उत्तर अमेरिका आणि युरोपात प्रथमच प्रत्यक्ष वापरत आणले. १८९५ साली ‘नोबे अँड हिटनर’ या कंपनीने ‘नायट्राजीन’ हे रायझोबियम जीवाणू असलेले जैविक खत प्रथम बाजारात आणले. भारत सरकारने १९५६ साली व्यावसायिक पातळीवर जैविक खतांची निर्मिती केली. पुढे नील-हरित-अल्गि, अॅझोटोबॅक्टर, अॅझोस्पिरिलम यांचा वापर करून अनेक जैविक खाते भारतीय कृषी क्षेत्रात प्रचलित झाली.
प्रजनन जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एकेकाळी निषिद्ध मानले गेलेले प्रयोगशाळेतील संशोधन आज मात्र समाजाची प्रत्यक्ष गरज झाहे. जसे की गर्भ लिंगनिदान, शरीराबाहेर स्त्री-पुरुष बिजांचे फलन (टेस्टट्यूब बेबी) आणि क्लोनिंग. शेतकीक्षेत्रात जनुकीय फेरबदल करून निर्माण झालेले धान्य आणि फळे हे तर दैनंदिन खाद्या बनले आहे.
भारतामध्ये क्वांटम डॉट तंत्रज्ञानावर आधारित एक पोर्टेबल कीट विकसित झाले असून ते रक्तातील किंवा अन्नातील सूक्ष्मजंतू काही मिनिटांत शोधते. यासाठी भारतात २०२४ मध्ये पेटंट दाखल झाले आहे. याशिवाय, अमेरिकेत ग्राफीन आधारित बायोसेन्सरने करोनासारखे विषाणू ओळखण्यात यश मिळवले आहे (यूएस पेटंट नं. ११,९४६,९३१).
आसाम कृषी विद्यापीठाने डुकरांमध्ये आढळणाऱ्या ‘अफ्रिकन स्वाइन फीव्हर’ रोगासाठी एक जलद निदान कीट तयार केले आहे. हे व्यावसायिक स्तरावर उपलब्ध करून देण्याची तयारी सध्या सुरू आहे. केरळच्या राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी या संस्थेने प्रतिजैविक प्रतिकार करणाऱ्या जीवाणूवर संशोधन केले असून हे भविष्यात नवीन औषधनिर्मितीत मदत करू शकते. ‘लॅब-ऑन-चिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता केवळ ३-५ मिनिटांत रोगनिदान करता येते. एका काचेच्या पट्टीवर सर्वसमावेशक बहुउद्देशीय प्रयोगशाळा असते. हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात फार उपयुक्त ठरते.
डॉ. रेणू सिंह-मोकाशी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org
