scorecardresearch

भाषासूत्र : भाषाभगिनींचा प्रभाव

‘मराठीच्या जन्मापासून विसाव्या शतकापर्यंत कर्नाटकाचा महाराष्ट्राशी निकटचा संबंध आहे.

marathi word

भानू काळे

सीमावर्ती राज्यांच्या भाषा म्हणजे आपल्या भाषाभगिनीच असतात. सततच्या संपर्कामुळे त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतच असतो. उदाहरणार्थ, कन्नड भाषा! चालुक्य, राष्ट्रकूट या कन्नडभाषक घराण्यांनी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रावरही राज्य केले. आदिलशाहीमध्ये कर्नाटकच्या जोडीने महाराष्ट्रदेखील होता. पंढरपूरचा विठोबा कर्नाटकतही पूज्य मानला जातो. म्हणूनच त्याला ‘कानडा विठ्ठलू’ म्हणतात. भारतरत्न भीमसेन जोशी हे मूळचे कर्नाटकातले. धारवाड, बेळगाव, कारवार, गुलबर्गा या शहरांत मराठीबांधव मोठय़ा संख्येने स्थायिक झाले आहेत. ‘मराठी भाषेचा इतिहास’ या पुस्तकात डॉ. गं. ना. जोगळेकर म्हणतात, ‘‘मराठीच्या जन्मापासून विसाव्या शतकापर्यंत कर्नाटकाचा महाराष्ट्राशी निकटचा संबंध आहे. पर्यायाने कन्नड आणि मराठी या एकमेकींच्या भौगोलिक जवळिकीमुळे सहवर्ती भाषा आहेत.’’

‘अडगुळं मडगुळं, सोन्याचं कडबुळं..’ किंवा ‘अटक मटक चवळी चटक’ यांसारखी शिशुगीते कन्नडमधूनच आली. अनेक कन्नड शब्द आपण स्वीकारले. उदाहरणार्थ- गोंधळ, बोभाटा, भीड, चव, अडकित्ता, मुरकुंडी. अप्पा, अण्णा, अम्मा, ताई, अक्का ही आपलेपणा दाखवणारी संबोधनेही कन्नडमधून आली. अन्य बहुतेक भारतीय भाषांमध्ये तुपासाठी संस्कृत ‘घृत’पासून बनलेला ‘घी’ शब्द वापरतात. मराठीत मात्र आपण ‘तूप’ शब्द वापरतो; जे कन्नड ‘तुप्प’चे रूप आहे.

गुजराती भाषेच्या संदर्भातही हे खरे आहे. उंधियू, ढोकळा, खमण, थेपला, कढी यांच्यासारख्या खाद्यपदार्थाप्रमाणेच खेडूत, चोपडी, लोचा, तेजी, मंदी, वांधा असे अनेक गुजराती शब्द मराठीने स्वीकारले. हिंदीचा प्रभाव तर इतका आहे, की तो मुद्दाम दाखवायची गरजच नसावी. पंतप्रधान या शब्दाऐवजी ‘प्रधानमंत्री’, प्रेक्षकांऐवजी ‘दर्शक’, समारंभ साजरा झाला याऐवजी ‘समारंभ संपन्न झाला’, अवश्य यावे याऐवजी ‘उपस्थिती प्रार्थनीय आहे’ यांसारखे आता आपल्याकडे सर्वत्र रूढ झालेले शब्दप्रयोग हा हिंदीचाच प्रभाव आहे.

भाषाभगिनींचा असा प्रभाव नाकारण्यापेक्षा किंवा त्याच्याशी सतत संघर्ष करत राहण्यापेक्षा तो प्रभाव स्वीकारून पुढे जाणे आणि त्याच्यासह आपली भाषा उत्तमोत्तम साहित्यनिर्मितीतून अधिकाधिक संपन्न करत राहणे, श्रेयस्कर वाटते.

bhanukale@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-12-2022 at 04:49 IST
ताज्या बातम्या