scorecardresearch

भाषासूत्र : वाक्प्रचार आणि रंगभूमी

कलगी तुळशीच्या मंजिरीसारखी दिसते आणि तुरा मक्याच्या कणसावर असलेल्या शेगडीसारखा दिसतो.

– डॉ. नीलिमा गुंडी nmgundi@gmail.com

‘पुण्यातील मेट्रोच्या श्रेयवादावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा चालू आहे’, असे वाक्य वाचनात आले आणि विविध वाक्प्रचारांचे रंगभूमीवरील सादरीकरणाशी असलेले नाते शोधावेसे वाटले. कलगीतुरा चालणे म्हणजे स्पर्धा चालणे, श्रेष्ठत्वावरून भांडण चालणे असा अर्थ आहे. मुळात कलगी आणि तुरा हे शब्द लावणीशी संबंधित आहेत. लावणी हे रंगभूमीवरून सादर होणारे एक प्रकारचे लोकनृत्य आहे. ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह’ या कोशात डॉ. विलास खोले यांनी कलगी व तुरा या शब्दांवर प्रकाश टाकला आहे, तो असा : कलगी आणि तुरा हे दोन्ही शब्द फारसी असून ती शिरोभूषणांची नावे आहेत. हे शब्द आपल्याकडच्या एकेकाळच्या आध्यात्मिक वादाचे प्रतिनिधित्व करतात. त्यावर आधारित गटांमधल्या शाहिरांचे सवाल जवाब रंगत असत. कलगी हे शक्तिपक्षाचे चिन्ह, तर तुरा हे शिवपक्षाचे चिन्ह होय. कलगी तुळशीच्या मंजिरीसारखी दिसते आणि तुरा मक्याच्या कणसावर असलेल्या शेगडीसारखा दिसतो. हे संदर्भ आज विस्मरणात जमा झाले तरी त्यातील मूळ स्पर्धेचा भावार्थ वाक्प्रचारात टिकून राहिला आहे.

‘सुधारक’कर्ते गोपाळराव आगरकर यांच्या पत्नी यशोदाबाई आगरकर यांनी लग्नानंतर पुणे ते कऱ्हाड हा प्रवास बैलगाडीने केला, तेव्हा त्या कष्टदायक प्रवासाच्या आठवणी सांगताना यशोदाबाई लिहितात : ‘पुण्यास होणाऱ्या माझ्या भावी सासुरवासाची ती नांदीच झाली म्हणावयाची!’ यातला ‘नांदी’ हा शब्द नाटकाशी संबंधित आहे. नांदी म्हणजे नाटकाच्या सुरुवातीला देवतेला उद्देशून म्हटलेले प्रार्थनागीत असते. त्यामुळे नांदी होणे म्हणजे सुरुवात होणे, असा वाक्प्रचार रूढ झाला. काही वेळा नांदी ही नाटकातील अनुभवाचे सूचन करणारी असते. त्यामुळे पुढच्या बिकट आयुष्याची कल्पना सुरुवातीलाच आली, हाही अर्थ वरच्या वाक्यातून व्यक्त झाला आहे. नाटक म्हणजे नटांच्या साहाय्याने केलेला रंगमंचीय खेळ / प्रयोग होय. मात्र व्यवहारात ‘नाटकं करणे’ म्हणजे ढोंग करणे, असा वाक्प्रचार रूढ आहे. तमाशा पाहणे ( दुरून मजा पाहणे ), पडदा पाडणे ( दृष्टिआड करणे ) असे इतरही वाक्प्रचार येथे आठवतात.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi language learning marathi phrases theatre in marathi zws

ताज्या बातम्या