यास्मिन शेख

पुढील दोन वाक्ये वाचा-

(१) माझ्या सहृदयी मित्राने त्या गरीब, उपाशी मुलांना भरपूर खाऊ देऊन तृप्त केले.

(२) आपल्या हाताखाली काम करणाऱ्या निरपराध कामगारांना छळणारे निर्दयी अधिकारी पाहिले, की माणुसकीवरच्या आपल्या विश्वासाला तडा जातो.

पहिल्या वाक्यात ‘सहृदयी’ आणि दुसऱ्या वाक्यात ‘निर्दयी’ या विशेषणांची रूपे सदोष आहेत. योग्य विशेषणे आहेत- सहृदय आणि निर्दय. या विशेषणांना ईकारान्त रूप देण्याची मुळीच आवश्यकता नाही. पण अशी रूपे मराठी भाषकांच्या बोलण्यात व लेखनातही वारंवार आढळतात.

सहृदय-(विशेषण) अर्थ आहे- माणुसकी वा कळवळा आहे असा, दयाळू, प्रेमळ. या शब्दात ‘हृदय’ या नपुंसकलिंगी नामाला ते केवळ एक इंद्रिय आहे, असा अर्थ नसून अंत:करण, मन, काळीज असे अर्थ आहेत. सहृदय म्हणजे ज्याचे अंत:करण दुसऱ्याच्या दु:खाने व्यथित होते असा. आणखी एक विशेषण पाहा- हृदयशून्य- या विशेषणाचा अर्थ आहे, माणुसकी नसलेला, दुसऱ्याच्या दु:खाने व्याकुळ न होता उलट आनंदित होणारा, दुष्ट. सहृदयच्या विरुद्ध अर्थी हे विशेषण प्रचारात आहे. सहृदय हा संस्कृतातून मराठीने स्वीकारलेला तत्सम शब्द असला, तरी संस्कृतात या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. संस्कृत अर्थ- दयाळू, सरळ मनाचा, विद्वान, रसिक, आवड असलेला. मराठीने या विविध अर्थापैकी सुरुवातीला दिलेले अर्थच स्वीकारले आहेत.

निर्दय (वि.) अर्थ- दया नसलेला, कठोर, निष्ठुर, कठोर अंत:करणाचा, दयाहीन.

या दोन्ही विशेषणांचे सहृदयी, निर्दयी अशी ईकारान्त रूपे करणे अत्यंत चुकीचे आहे. वरील वाक्ये- १) ‘माझ्या सहृदय मित्राने..तृप्त केले.’ २) ..निरपराध कामगारांना छळणारे निर्दय अधिकारी पाहिले.. तडा जातो.

आता अशी काही अकारान्त विशेषणे पाहा-

निर्भय, दुर्बळ, जटिल, निष्प्रभ, निर्मळ, द्वैभाषिक, चिंतातुर, निस्सीम.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृदयंगम, हृदयद्रावक, लक्षवेधक, अरसिक, सुरूप, कुरूप, सजीव, सगुण इ. अशा अकारान्त विशेषणांचे ईकारान्त रूप आपण कधीच करत नाही. मग सहृदय, निर्दय या अकारान्त शब्दांना अपवाद का? मराठी भाषकांनी मराठीतील इतक्या समर्पक शब्दांची अवहेलना करू नये.