भानू काळे
क्रिकेट म्हणजे ‘राजांचा खेळ आणि खेळांचा राजा’. जिथे ब्रिटिश साम्राज्य होते तिथेच क्रिकेट खेळले जाते. भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटची चर्चा शाळेतल्या वर्गापासून ज्येष्ठ नागरिक कट्टय़ापर्यंत देशभर सुरू असते. साहजिकच वृत्तपत्रांतून क्रिकेट सामन्यांचे विस्तृत वर्णन पूर्वीपासून येत असे.
मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या ‘संदेश’ने त्यात आघाडी घेतली होती. साधारण १९२० नंतर त्यांनी क्रिकेटमधील शब्दांना मराठी प्रतिशब्द योजायला सुरुवात केली. गोलंदाज (बॉलर), फलंदाज (बॅट्समन), क्षेत्ररक्षक (फील्डर), यष्टिरक्षक (विकेटकीपर), षटक (ओव्हर), निर्धाव षटक (मेडन ओव्हर) वगैरे काही शब्द ‘संदेश’नेच प्रथम रूढ केले.
पुढे आकाशवाणीवरून क्रिकेट सामन्यांचे धावते समालोचन (रिनग कॉमेंटरी) सुरू झाले. विजय मर्चन्ट किंवा डिकी रत्नाकर यांच्यासारखे समालोचक खूप लोकप्रिय झाले. पण त्यांची भाषा इंग्रजी होती. त्याच सुमारास संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मराठी राजभाषा झाली. साहजिकच मराठीतून धावते समालोचन सुरू झाले. गरज ही शोधाची जननीआहे म्हणतात व त्यानुसार क्रिकेटमधील असंख्य शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधले गेले. समालोचक बाळ ज. पंडित तसेच पत्रकार वि. वि. करमरकर, चंद्रशेखर संत वगैरेंनी याबाबत पुढाकार घेतला. फलंदाजीशी निगडित असे धाव, चोरटी धाव, चौकार, षटकार, शतक, अर्धशतक वगैरे शब्द; खेळाडू बाद होण्यासाठीचे त्रिफळाचीत, यष्टिचीत, स्वयंचीत, पायचीत, धावबाद, झेलचीत वगैरे प्रकार; गोलंदाजीचे जलदगती, मध्यमगती, फिरकी वगैरे प्रकार असे अगणित शब्द रूढ झाले. नाणेफेक, कर्णधार, उपकर्णधार, निवडसमिती, मालिका, पंच, तंबू, राखीव, सीमारेषा, सीमापार, प्रेक्षागृह, खेळपट्टी, बाद, नाबाद, ‘दांडी गुल’ होणे, भोपळा फोडणे, धुव्वा उडणे यांसारखे क्रिकेटव्यतिरिक्त इतरत्रही वापरता येतील असे आनुषंगिक शब्ददेखील वापरात आले. आकाशवाणी राज्यभर पोहोचत होती व त्यामुळे ते प्रतिशब्ददेखील सगळीकडे पोहोचले; मराठी भाषेत मोलाची भर पडली.
bhanukale@gmail.com