– वैशाली पेंडसे-कार्लेकर

भाषेत बदल होताना, तिचा विस्तार होताना नवीन शब्दांची भर पडते. या नवीन शब्दांना विशेषत: सध्या इंग्रजीतून मराठीत येऊन रूढ होऊ पाहणाऱ्या शब्दांना आपल्या भाषेची ढब यावी यासाठी त्यांचं लिंग, वचन, सामान्यरूप अशा व्याकरणिक तपशिलाबाबत काही धोरण ठरवावं लागतं आणि त्यानुसार तो शब्द आपल्या भाषेत बसवून घ्यावा लागतो. उदा. टेबल- ते टेबल, अनेक टेबले/ टेबलं, टेबला-वर. पण बरेचदा हे शब्द आधी रूढ होतात आणि नंतर अधिकृतपणे भाषेत समाविष्ट होतात किंवा होतही नाहीत. दरम्यान, प्रत्येक जण आपल्यापरीने त्या शब्दाचं लिंग, अनेकवचनी रूप, सामान्यरूप ठरवून मोकळा होतो आणि बरेचदा तो शब्द वेगवेगळय़ा पद्धतीने वापरला जातो.

सामान्यरूपाबाबत विचार केला, तर सामान्यरूप हे मराठी भाषेचं खास वैशिष्टय़ आहे. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना मूळ रूपात होणारा बदल म्हणजे सामान्यरूप. उदा. घोडय़ा-वर, उंदरा-ला. पूर्वी मराठीने जे परकीय शब्द स्वीकारले, त्यांची मराठीच्या पद्धतीप्रमाणे सामान्यरूपं झालेली दिसतात. उदा. दुकाना-त, कार्डा-वर, कपा-त. पण गेल्या काही काळात मराठी भाषकांच्या तोंडी नव्याने रुळलेल्या इंग्रजी शब्दांचं सामान्यरूप झालेलं दिसत नाही. उदा. फोन-ला, फ्रीज-ला, ब्रश-ला खरंतर हे शब्द मराठी वळणानुसार फोनाला, फ्रिजाला, ब्रशाला असे वापरायला हवे. पण या बाबतीत ते परकेच राहिलेले दिसतात. या शब्दांना ‘त’ हा विभक्ती प्रत्यय लावून बघा बरं. सामान्यरूप केल्याशिवाय ‘त’ लावताच येणार नाही.

एकूणच आजच्या भाषेत विशेषत: नवीन पिढीच्या बोलभाषेत आधी रूढ झालेली सामान्यरूपंही टाळण्याची प्रवृत्ती दिसत आहे, असं माझं निरीक्षण आहे. उदा. बँकमध्ये, कपमध्ये, डॉक्टरला असे शब्द आढळतात.

‘एकारांत नामांचे सामान्यरूप याकारांत करावे. एकारांत करू नये.’ या १२ क्र. च्या लेखननियमाचा परभाषिक शब्दांशी संबंध नसला, तरी हा नियम पाळणाऱ्यांची संख्या घटत आहे. उदा. फडक्यांना/ फडकेंना अशी दोन्ही रूपं प्रचारात दिसतात. या नियमात बदल करण्याची मागणी अनेक अभ्यासकांनी पूर्वीच केली आहे आणि ती आता अधिक गरजेची वाटते. परभाषेल्या शब्दांच्या लिंग आणि वचनाबद्दल वाचू पुढच्या लेखात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vaishali.karlekar1@gmail.com