डॉ. निधी पटवर्धन

महाराष्ट्राच्या सागर किनाऱ्यावर निरनिराळे परकीय आले, तसेच पोर्तुगीजही आले आणि ते गोमांतकातच स्थिरावले. व्यापार, धर्मप्रसार, विविध व्यवसाय, राजकारण, वाङ्मय इत्यादी क्षेत्रांत अनेक पोर्तुगीज शब्द शिरले आणि ते मराठीत रुजले.

आता नाताळ शब्द पहा. ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करण्याचा सण आहे. पोर्तुगीज ख्रिसमसला नाताळ म्हणतात. त्यांनीही तो शब्द लॅटिन नटालीस वरून घेतला आहे. नटालीस म्हणजे जन्म वा जन्माविषयी. आता डॉक्टरच पाहा ना, विशेषकरून बाळंतपण आणि गर्भारपण याविषयी बोलताना प्री नेटल आणि पोस्ट नेटल असे शब्द नेहमी वापरतात.

फक्त मराठीतच नाही तर कोकणी, गुजराती बरोबरच जिथे जिथे पोर्तुगीज साम्राज्यवाद्यांनी वसाहती केल्या होत्या तिथे तिथे ख्रिसमसला नाताळच म्हणतात. कारण पोर्तुगीज भाषेत नाताळचा अर्थ जन्मदिन असा आहे. भारत, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, श्रीलंका, मालदीव बेटे, ब्राझील, अंकोला, मोझांबीक, ईस्ट तीमोर, बहरीन व मकाऊ इथे पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. ‘नेटल’; ‘नाताल’चे मराठीत ‘ळ’ घालून ‘नाताळ’ झाले.

आता काही बायका ज्याला ‘जन्म सावित्री’ म्हणतात ती भाजी म्हणजे बटाटय़ाची. हा ‘बटाटा’ शब्द पोर्तुगीज आहे. स्पॅनिश दर्यावर्दीनी ही वनस्पती युरोपात आणली व पुढे पोर्तुगीजांनी तिची भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात लागवड सुरू केली. तिथे तो पोर्तुगीज भाषेतील ‘बटाटा’ या नावाने ओळखला जाऊ लागला. ब्रिटिश व्यापाऱ्यांनी तो बंगालमध्ये नेला. तिथे तो ‘आलू’ या नावाने ओळखला जाऊ लागला.

‘हापूस’ आंबा आपला म्हणून ओळखला जातो. पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते. अल्बकर्की यांनी गोव्यात मोठी भटकंती करून आंब्यांच्या विविध जातींवर प्रयोग करत ही नवी जात विकसित केली. त्यावरून या आंब्याला ‘अल्फान्सो’ नाव मिळालं. पण स्थानिक लोक या आंब्याला ‘अफूस’ म्हणू लागले. आंब्याची ही जात महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोहोचेस्तोवर लोकांच्या तोंडी याचा उच्चार ‘हापूस’ असा झाला होता! तर नाताळ, बटाटा, हापूस या तीन शब्दांची कहाणी सुफळ संपूर्ण! काही आणखी पोर्तुगीज शब्द पुढच्या वेळी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nidheepatwardhan@gmail.com