महासागर एक महाकचराकुंडी आहे अशी समजूत करून घेऊन मानवासाठी निरुपयोगी असलेले आणि म्हणून त्याज्य ठरलेले विविध प्रकारचे द्रवरूपी आणि घनरूपी पदार्थ समुद्रात फेकून देण्याची प्रथा साधारण एकोणिसाव्या शतकापासून सुरू आहे. आजमितीस प्रतिवर्षी अब्जावधी टन कचरा आणि इतर प्रदूषके थेट अथवा अप्रत्यक्षपणे समुद्रात टाकली जात आहेत. जागतिक तसेच स्थानिक पातळीवर नागरी तसेच औद्योगिक घनकचरा व सांडपाणी, टाकाऊ ठरलेले किरणोत्सारी पदार्थ, शेतीसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांचे व कीटकनाशकांचे अंश, क्रूड ऑइल व तत्सम द्रवपदार्थाची वाहतूक करणाऱ्या जहाजांमधून अपघातांमुळे किंवा अन्य कारणांमुळे होणारी तेलगळती, या प्रदूषकांबरोबरच प्लास्टिकच्या कचऱ्याने सागरी प्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याशिवाय सागरी तळाचे उत्खनन करताना, जहाजांची ये-जा सुरू असताना होणारे ध्वनिप्रदूषणदेखील विशेषत: व्हेल, डॉल्फिनसारख्या सागरी जीवांसाठी अपायकारक ठरत आहे. जागतिक पातळीवर या प्रदूषणांमुळे जवळपास ८१७ सागरी प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले असून यात गेल्या पाच वर्षांत २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा >>> कुतूहल: समुद्रातील ध्वनिप्रदूषण

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Water reserves in the country at 35 percent Where is the worst situation
देशातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर… कुठे आहे सर्वाधिक बिकट स्थिती?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सागरी प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर होत चालली आहे. यूएनईपीच्या ताज्या अहवालानुसार दक्षिण आशियाई समुद्रात रोज जमा होणारा १५ हजार ३४३ टन एवढा कचरा भारतातील ६० प्रमुख शहरांमधून निर्माण होत असतो. भारताला सात हजार ५१७ किमीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. कचरा आणि इतर प्रदूषकांमुळे या जैवविविधतेची अपरिमित हानी होते आहे. त्यात सरकारी पातळीवर अलीकडेच किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या संदर्भात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करून किनारपट्टीच्या नैसर्गिक विकास आणि संवर्धनापेक्षा भौतिक विकासाला अधिक महत्त्व देण्यात आल्याने नजीकच्या काळात किनारपट्टीचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास झाला आहे.

हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी आणि मानवासहित इतर सर्व प्राण्यांना ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करणारी, जलचक्र आणि हवामान सुस्थितीत राखणारी, वनस्पती व प्राण्यांच्या लक्षावधी प्रजातींना आपल्यात सामावून घेऊन योग्य, अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणारी आणि मानवाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आर्थिक-सामाजिक-भौतिक स्थैर्य प्राप्त करून देणारी अशी ही नैसर्गिक परिसंस्था आहे. याची किमान जाणीव ठेवून आपण आपल्या परीने पर्यावरणपूरक कृती करण्याची गरज आहे.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org